Join us  

बम्बार्डियर लोकल धोकादायक

By admin | Published: May 29, 2014 2:23 AM

जर्मन बनावटीची बम्बार्डियर लोकल सेवेत येण्यापूर्वीच तिचा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक होणार असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

मुंबई : जर्मन बनावटीची बम्बार्डियर लोकल सेवेत येण्यापूर्वीच तिचा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक होणार असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या लोकलमध्ये दोन बदल करणे आवश्यक असून ते न केल्यास ती धोकादायक ठरू शकते, असे उच्च न्यायालयाने नेमलेल्या रेल्वेच्या मॉनिटरिंग कमिटीकडून एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) निदर्शनास आणले आहे. मात्र चार महिने झाले तरी त्यावर एमआरव्हीसीकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. बम्बार्डियर कंपनीच्या ७० लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. तर यापूर्वी दोन लोकल आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्या असून त्यांच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चाचण्या घेण्यात आल्या. दोन लोकल प्रत्यक्षात सेवेत आल्यानंतर पुढील प्रत्येक दोन ते तीन महिन्यांत चार लोकल दाखल होणार आहेत. या लोकलची चाचणी घेण्यापूर्वीच उच्च न्यायालयाने रेल्वे प्रवाशांच्या अपघातविरहित प्रवासाच्या आणि सुरक्षेच्या सूचना करण्यासाठी रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस आणि प्रवासी संघटनांची एक मॉनिटरिंग कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीने बम्बार्डियर लोकलची सहा महिन्यांपूर्वी पाहणी केली आणि त्यामध्ये या लोकलचा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकत असल्याची बाब निदर्शनास आली. बम्बार्डियर लोकलच्या डब्यात उभ्याने प्रवास करणार्‍या प्रवाशांना पकडण्यासाठी हॅण्डल दिले असून एका हॅण्डलला दोन पॅसेंजर पकडू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. तसेच इतर लोकलप्रमाणे या लोकलच्या डब्यातील मध्यभागीही एक खांब असल्याने त्यालाही पकडून प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. मात्र या दोघांचाही दर्जा खराब असून त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे अशक्य असल्याचे निदर्शनास आले आहे. एखादा प्रवासी या हॅण्डलला किंवा खांबाला पकडून दरवाजाजवळ लटकून प्रवास करत असल्यास प्रवाशाचा हात सटकून लोकलबाहेर फेकला जाऊ शकतो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना हॅण्डल आणि खांब पकडणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे यात बदल करण्यात यावा अन्यथा मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल, अशी भीती या कमिटीकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब चार महिन्यांपूर्वी कमिटीकडून लेखी स्वरूपात एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सांगण्यात आली होती. त्यानंतरही या लोकलमध्ये बदल झाले नसल्याचे या कमिटीचे सदस्य सुभाष गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)