Join us  

उद्योजकांकडून उकळली सहा लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खुनाची धमकी देऊन उद्योजकांंकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (रा. अंबिकानगर, ठाणे), सोमनाथ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : खुनाची धमकी देऊन उद्योजकांंकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (रा. अंबिकानगर, ठाणे), सोमनाथ दाभाडे (रा. जयभवानीनगर, ठाणे) आणि शरद मोहतेकर (चितळसर, ठाणे) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून सुरू आहेत. यासंदर्भातील काही तक्रारी उद्योजकांच्या ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) या संघटनेकडे आल्या होत्या. त्याच अनुषंगाने एका उद्योजकाने दिलेल्या तक्रारीनुसार पटेकर याच्यासह तिघांनी ३५ लाखांच्या खंडणीचीही मागणी केली. ही रक्कम दिली नाही, तर ठार मारण्याचीही त्यांना धमकी दिली. त्यामुळे जागेच्या व्यवहारामध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच त्यांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून भीतीपोटी या तिघांनाही २७ मार्च २०२० रोजी चार लाख रुपये तसेच १४ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये, अशी सहा लाखांची रक्कम या उद्योजकाने दिली. त्यानंतरही जागेच्या हस्तांतरण व्यवहारामध्ये त्यांनी या उद्योजकाकडे आणखी ६० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ती दिली नाही, तर त्यांना पुन्हा धमकी दिली. अखेर, या प्रकाराला कंटाळून या उद्योजकाने २ डिसेंबर रोजी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली.