Join us  

‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांना भारतबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 1:30 AM

‘डीजीसीए’चे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  अमेरिकी बनावटीच्या ‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांवरील भारतबंदी कायम असल्याचे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे. सहा महिन्यांच्या आत झालेल्या दोन अपघातांनंतर २०१९ मध्ये डीजीसीएने या विमानांच्या उड्डाणास बंदी घातली आहे.भारतात ‘बोईंग ७३७ मॅक्स’ या प्रकारातील विमानांची सेवा देण्याची परवानगी संयुक्त अरब अमिरातमधील फ्लाई-दुबई या कंपनीने डीजीसीएकडे मागितली होती.  संबंधित विमान कंपनीची बोईंग ७३७-८ आणि बोईंग ७३७-९ या प्रकारातील विमाने पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. देशातील कोणत्याही विमानतळावर उतरण्यास या विमानांना परवानगी नाही, भारतीय हवाई क्षेत्रातूनही ‘बोईंग ७३७ मॅक्स’ प्रकारातील विमानांची वाहतूक करता येणार नाही, असे डीजीसीएने म्हटले आहे.भारतात स्पाइस जेट आणि दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेजकडे ‘बोईंग ७३७ मॅक्स’ प्रकारातील १८ विमाने आहेत. २०१९ पासून ती जमिनीवर उभी आहेत. ही विमाने परत पाठवायची असल्यास त्यांना उड्डाणाची परवानगी देण्यात येत असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले. 

अपघातानंतर घेतला निर्णय२९ ऑक्टोबर २०१८ रोजी इंडोनेशिया आणि ९ मार्च २०१९ मध्ये इथोपिया येथे ‘बोईंग ७३७ मॅक्स’ या विमानांना अपघात झाला. या दोन्ही घटनांत मिळून ३४६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यात काही भारतीयांचाही समावेश होता. त्यामुळे २०१९ मध्ये भारतात या विमानांना बंदी घालण्यात आली. त्यानंतर संबंधित विमान निर्मात्या कंपनीने या विमानांतील त्रुटी पूर्णतः दूर केल्याचे म्हटले होते. परंतु, त्यानंतरही त्यांना परवानगी देण्यात आली नाही.