Join us  

हेरीटेज इमारतीतून १० दिवसांनी काढला वृद्ध महिलेचा मृतदेह; कुलाबा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 4:20 AM

एकट्याच राहत असल्याचे उघडकीस

मनीषा म्हात्रे मुंबई : कुलाबा येथील हेरिटेज इमारतीच्या आलिशान फ्लॅटमध्ये ६६ वर्षीय अरवालेन तारवाला यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या १० दिवसांपासून घरातच मृतावस्थेत पडून होत्या. घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजारी जागे झाले आणि हे प्रकरण उघडकीस आले.

कुलाबा येथील सुग्रा या हेरिटेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अरवालेन या गेल्या २० वर्षांपासून राहण्यास होत्या. त्यांनी लग्न केले नाही. इमारतीचे मालक इस्माईल ताहीर तारवाला (७५) हे त्यांचे भाऊ आहेत. ते पुण्यात असतात. रविवारी रात्री इमारतीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास मिळाली. नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा अरवालेन या जमिनीवर कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांचा मृत्यू किमान १० ते १२ दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कुलाबा पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही इमारत आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू नैसर्गिक असून, या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फडतरे यांनी दिली.

१७ मे ला पोलिसांची अखेरची भेटपोलिसांकडून एकट्या राहणाºया ज्येष्ठ नागरिकांची नोंद करत, त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करण्यात येते. त्यानुसार, कुलाबा पोलीस ठाण्यातदेखील अरवालेन यांची नोंद होती. १७ मेला त्यांच्या घरी पोलिसांनी अखेरची भेट दिली असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. त्या दरवाजा उघडत नसत. दरवाजाच्या फटीतूनच पोलिसांशी संपर्क साधत असल्याचे कुलाबा पोलिसांनी सांगितले.

एकाकी जीवनाचे असेही बळी...९ फेब्रुवारी २०१८ : कुलाब्यातील संगीत इमारतीच्या तीन बीएचके (फ्लॅट क्रमांक ३०)मध्ये अल फारुक कबाली (६५)पत्नीसह राहायचे. वृद्ध आईवडिलांना सोडून एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा मस्कतला स्थायिक झाला. तीन वर्षांपूर्वी पत्नी घटस्फोट घेत मुलीसह बाहेर पडली. मृत्यूच्या १५ दिवसांनी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. वडिलांच्या मृत्यूच्या बातमीनंतर मस्कतमधील मुलगा १० वर्षांनी परतला होता.

८ नोव्हेंबर २०१८ फोर्ट येथील मोगल इमारतीत राहणारे फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो (६०) यांचा चार दिवसांनी कुजलेला मृतदेह घरातून काढण्यात आला होता. ते हाँगकाँग बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. कामात व्यस्त असल्याने त्यांच्या अंत्यविधीला येण्यासाठी अमेरिकेतील मुलाने नकार दिला होता. भाचीने अंत्यविधीच्या बदल्यात मालमत्तेचा ताबा मागितला होता.