Join us

चार मच्छीमारांसह बोट बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : सातपाटी बंदरातून गुरुवारी सकाळी समुद्रात मासेमारीला गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट चार मच्छीमारांसह ...

हितेन नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : सातपाटी बंदरातून गुरुवारी सकाळी समुद्रात मासेमारीला गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट चार मच्छीमारांसह बेपत्ता असून हाकेच्या अंतरावर गेलेली ही बोट दोन दिवस झाले बंदरावर परतली नसल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

सातपाटीच्या विशाल मित्रमंडळातील ज्ञानेश्वर माणिक तांडेल हे मालक आपली ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते. त्यांच्या बोटीत दिलीप माणिक तांडेल, जगन्नाथ लक्ष्मण तांडेल आणि प्रवीण पांडुरंग धनू हे मच्छीमार असून ते दक्षिणेच्या भागात एडवन गावासमोर गेल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. सकाळी जाऊन संध्याकाळी येणारी बोट शुक्रवारीही परतली नसल्याने सातपाटी सागरी पोलिसांना कळविण्यात आले आहे.

सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या बोटीबाबत कोस्ट गार्ड, नेव्ही, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील ११२ कि.मी.वरील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना कळविले आहे. या बोटीसोबत गेलेल्या शेजारच्या एका मच्छीमार बोटीने ‘अग्निमाता’ या बोटीला गुरुवारी पाहिले असल्याची माहिती पुढे येत असून, अगदी ८ ते १० कि.मी. अंतरावर मासेमारीला गेलेली बोट चार मच्छीमारांसह गायब झाल्याने किनारपट्टीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासन पातळीवरून या बोटीचा शोध घेण्यात येत असून या मच्छीमारांच्या शोधासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आल्याची माहिती सागरी पोलिसांनी दिली आहे.