दुसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 01:12 AM2020-11-16T01:12:39+5:302020-11-16T01:13:30+5:30

प्रशासनाकडून योग्य खबरदारी; कोरोनाला परतवूनच लावणार

BMC, hospitals ready for the second wave in Mumbai | दुसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज

दुसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील आठ महिन्यांपासुन मुंबईत कोरोनाचा कहर सुरू आहे. पण मागील महिन्याभरापासून मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत चालली असूनही दिलासादायक बाब आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे कोरोना कमी झाला म्हणत नागरिक मात्र कमालीचे बेफिकीर झाले आहेत. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती महापालिकेकडूनही व्यक्त होत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारच्या खबरदारी घेण्याचे आदेश जारी केले आहेत.


कोणत्याही स्थितीत कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सर्व खबरदारी घेणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सरकारच्या प्रयत्नांमध्ये जनतेचे सहकार्य अतिशय मोलाचे आहे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वेळोवेळी केले आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकतो, असा इशारा राज्य टास्क फोर्स समितीनेही दिला आहे. असे घडले तर कोरोना संसर्गाची तीव्रता वाढू शकते. यामुळे गाफील न राहता मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग करावा, सुरक्षित अंतर राखावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, साधेपणाने उत्सव साजरा करावा, कोरोनाबाधितांना त्रास होवू नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. 


फ्ल्यू सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण
दुसऱ्या लाटेसंदर्भातील सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा यासाठी आपण फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे सर्व्हेक्षण नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत फिवर क्लिनिक या सर्व्हेक्षणात महत्वाची भूमिका बजावू शकतात. यामुळे एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम (आय.डी.एस.पी) अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून फ्ल्यू सदृष्य आजार असलेल्या रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन नियमितपणे होऊन, साप्ताहिक ट्रेन्ड समजावून घेणे आवश्यक आहे.

७० हजार खाटा आहेत सज्ज
संपूर्ण मुंबईत ७० हजार खाटा सज्ज आहेत. दुसरी लाट आली तर हे बेडस त्वरित उपलब्ध होतील, अशा अवस्थेत ठेवण्यात येणार असल्याचेही पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.  


५२० कोव्हिड सेंटर-रुग्णालय सज्ज आहेत. कोरोनाचे रुग्ण गेल्या महिन्याभरात खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे हजारो बेडस रिकामे पडले आहेत. काही कोव्हिड सेंटरमध्ये शुकशुकाट आहे. पण असे असले तरी आम्ही एकही कोव्हिड सेंटर बंद करणार नाही.           - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

Web Title: BMC, hospitals ready for the second wave in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.