Join us  

पाच नव उद्योजकांच्या पंखात पालिकेचे बळ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 8:53 PM

'स्टार्ट अप'ला चालन देण्यासाठी पालिकेने सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्र्रपोन्योरशिप कॉन्सील (स्माईल) ही सुविधा सुरु केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. अशा नव उद्योजकांची पहिली तुकडी आपल्या अभिनव संकल्पना घेऊन पालिकेच्या विभागांसोबत काम करण्यास सज्ज झाली आहे. यामध्ये 'ब्लूटूथ सक्षम स्टेथोस्कोप' या उपकरणाद्वारे डॉक्टरला स्टेथोस्कोप कानाला न लावता रुग्णांना तपासता येणार आहे. तसेच मधुमेह होण्यापूर्वीच समजणार असल्याच्या उपक्रमांचा समावेश आहे. 

'स्टार्ट अप'ला चालन देण्यासाठी पालिकेने सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्र्रपोन्योरशिप कॉन्सील (स्माईल) ही सुविधा सुरु केली. या केंद्रात पाच नव्या उद्यमींची पहिली तुकडी पालिकेबरोबर काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. या केंद्रांमार्फत नागरिकांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. यात पहिले पाच तंत्रज्ञान विकसित करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. 

असे आहे पाच नवीन प्रयोग....

* ब्ल्यू टूथ स्टेथोस्कोप - या तंत्रज्ञानात डॉक्टरला रुग्णांच्या जवळ न जाताही स्टेथोस्कोपने निदान करता येणार आहे. हे वायरलेस स्टेथोस्कोप ब्ल्यू टूथने मोबाईलशी जोडलेले असतील. रुग्णांनी हे स्टेथोस्कोप स्वत:च्या शरीरावर ठेवल्यास डॉक्टरच्या मोबाईलवर त्याच्या नोंदी दिसणार आहेत. 

* बायोनिक होप - या तंत्रज्ञानात कृत्रिम हात तयार केलेला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या दृष्टीने अधिक नैसर्गिक आणि मुक्त हालचाल करण्यास मदत होईल. हा कृत्रिम हात प्रयोगिक तत्वावर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांनाही आवश्‍यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

* न्यूरोथेरपी स्कि्नर - या उपकरणात मधुमेहपूर्व टप्प्यातच संशयित रुग्ण लक्षात येणार आहे. त्यामुळे आजार गंभीर होणार नाही, तसेच संशयित रुग्णाला वेळीच मधुमेहावर नियंत्रण मिळवता येणार आहे.

* कोरोनाच्या विविध प्रकारांचे निदान करण्यासाठी पालिकेने गुणसुत्रीय (जिनोमीक) प्रयोगशाळा कस्तुरबा रुग्णालयात सुरु केली. नवीन तंत्रज्ञानामुळे भविष्यात सर्वच संसर्गजन्य आजारांचे निदान वेगाने होऊ शकेल. 

* घनकचरा व्यवस्थापन (जैविक कचरा तसेच कचऱयापासून ऊर्जा निर्मिती), पाणी आणि सांडपाणी या विषयांमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

असे मिळणार प्रोत्साहन....

स्माईल सेंटरच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या नव उद्योजकांना त्यांचे तंत्रज्ञान, वस्तू, उपकरण आदी पालिकेच्या संबंधत खात्यांमध्ये उपयोगात आणण्याची संधी प्रदान केली जाणार आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका