Join us  

लोकलच्या वाढदिवसालाच ब्लॉक, तांत्रिक बिघाडामुळे खोळंबला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 6:29 AM

भारतीय रेल्वेला मंगळवारी १६६ वर्षे पूर्ण झाली. मात्र, याच दिवशी रेल्वे प्रवाशांना लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागले.

मुंबई/ डोंबिवली : भारतीय रेल्वेला मंगळवारी १६६ वर्षे पूर्ण झाली. मात्र, याच दिवशी रेल्वे प्रवाशांना लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागले. आंबिवलीतील सिग्नल यंत्रणेतील बिघाड, त्यानंतर दुपारी उल्हासनगर येथे अचानक घेतलेला ब्लॉक तसेच ठाकुर्ली रेल्वेस्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.आंबिवली-शहाड थानकांदरम्यान मुंबई दिशेकडील सिग्नल यंत्रणेत मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे सकाळच्या वेळेत कसारा येथून येणाऱ्या लोकल १५ मिनिटे विलंबाने धावल्या. दुपारपर्यंत हा घोळ सुरूच होता. त्यातच, कल्याण ते उल्हासनगर येथे तांत्रिक तपासणीसाठी दुपारी १.३० ते १.४० ब्लॉक घेण्यात आला होता. यावेळी रेल्वेने उष्णतेमुळे काही समस्या निर्माण होते का, याची चाचपणी केल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. जैन यांनी दिली. त्यानंतर, दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये समस्या निर्माण झाली. त्यामुळे कल्याण व डोंबिवली अशा दोन्ही दिशांकडे धीम्या मार्गांवर लोकलच्या रांगा लागल्या.हार्बर मार्गावर दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत वडाळा ते शिवडीदरम्यान सीएसएमटी दिशेकडील मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. अघोषित ब्लॉकवेळी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. कल्याण स्थानकावर दुपारी १ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत एकही जलद लोकल चालविण्यात आली नाही. त्यामुळे कल्याण स्थानकावर प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती, तर कसारा आणि कर्जतहून येणाºया लोकल उशिराने धावत असल्याने, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास तब्बल तासाभराचा उशीर झाला.अचानक रेल्वे रुळांचे काम हाती घेण्यात आल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक या दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली होती. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वडाळा रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. वडाळा स्थानकातून पनवेल व बेलापूर विशेष लोकल चालविण्यात आली.मात्र, हार्बर मार्गावरील अंधेरी-गोरेगाव रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना बराच काळ लोकलची वाट बघत उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर होता.^‘कल्याणहून भायखळ्याला येण्यासाठी तब्बल दोन तास’कार्यालयात ३ वाजता उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, मंगळवारी लोकल खूप उशिराने धावत होत्या. कल्याण स्थानकावर १ वाजून १५ मिनिटांपासून उभा होतो. त्यानंतर, २ वाजून ०९ मिनिटांनी सीएसएमटीला जाणारी जलद लोकल आली. या एक तासाच्या दरम्यान चार जलद लोकल धावतात. मात्र, या लोकल रद्द केल्याने, त्यानंतर आलेल्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. यात सायन ते माटुंगा दरम्यान ५ ते १० मिनिटे लोकल थांबली होती. त्यामुळे कल्याणहून भायखळ्याला येण्यासाठी तब्बल दोन तास लागले, असे प्रवासी प्रशांत पवार यांनी सांगितले.>...यासाठीच घेतला ब्लॉकवाढत्या उन्हामुळे रेल्वेचे रूळ प्रसरण पावतात. रेल्वे रुळावरून सतत लोकल जात असल्याने, रुळांचा आकार पसरट होतो. त्यामुळे लोकल रुळावरून खाली उतरण्याची शक्यता असते. रेल्वेचे कर्मचारी उन्हामध्ये रेल्वे रुळांची पाहणी करण्यासाठी रुळांचे प्रसरण, आकार आणि लांबीची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी रुळाचे प्रसरण झाल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ब्लॉकबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती उद्घोषणेद्वारे देण्यात आली नाही. रेल्वेने ब्लॉक घेण्याची माहिती प्रवाशांना देणे आवश्यक असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिली.