Join us  

भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेचा ‘सुरुंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:12 AM

मेट्रो रेल्वेपाठोपाठ भाजपाच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने ‘सुरुंग’ लावला आहे.

मुंबई : मेट्रो रेल्वेपाठोपाठ भाजपाच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने ‘सुरुंग’ लावला आहे. केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई बंदर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी जेट्टी (बहुउद्देशीय धक्का) उभारून ती मरिन ड्राइव्हला जोडली जाणार होती. मात्र, ती जागा मुंबई पोर्ट ट्रस्टला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सुधार समितीत बुधवारी फेटाळला.देशातील मोठ्या शहरांना लहान शहरांशी जोडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. गिरगाव चौपाटीवरून राज्यातील लहान शहरांना जोडण्यासाठी सीप्लेन सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला होता. सीप्लेनसाठी गिरगाव चौपाटीवर जेट्टी बनविण्याकरिता बिर्ला क्रीडा केंद्राचा भूखंड मुंबई पोर्ट ट्रस्टने पालिकेकडे मागितला आहे. त्यानुसार ही जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सुधार समितीच्या पटलावर आज मंजुरीसाठी मांडला.बिर्ला कला-क्रीडा केंद्राने मराठीच नाही, तर गुजराती कलाकारांनाही व्यासपीठ आणि नावलौकिक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे जेट्टीसाठी कला क्रीडा केंद्राचा बळी देऊ नका, अशी भूमिका शिवसेनेने मंडली. या जेट्टीचा उपयोग स्थानिक कोळी समाजाला होणार का, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. हा प्रस्ताव रद्द करण्याचा हट्टच शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. अखेर काँग्रेसनेही साथ दिल्यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे भाजपा नगरसेवकांवर केवळ चरफडत राहण्याची वेळ आली.>सागरी मार्ग रखडलाबिर्ला क्रीडा केंद्राची जागा मुंबई पोर्ट ट्रस्टला विमानाची जेट्टी बांधण्यासाठी दिली असती तर त्या मोबदल्यात ट्रस्टकडून पालिकेला ५०० कोटी चौरस मीटरची जागा मिळणार होती. शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पासाठी ही जागा आवश्यक होती. मात्र, मुंबई पोर्ट ट्रस्टला जेट्टीसाठी जागा नाकारल्यामुळे कोस्टल रोडसाठी जागा मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.>अशी झाली शाब्दिक चकमकबिर्ला क्रीडा केंद्राची जागा जेट्टीसाठी देण्याचा प्रस्ताव सुधार समितीमध्ये बहुमताच्या जोरावर शिवसेनेने दफ्तरी दाखल केला. हवेतल्या गोष्टींसाठी विकासाच्या नावावर मुंबईचे वैभव नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला.यास प्रत्युत्तर देताना, बिर्ला क्रीडा केंद्र गेली अनेक वर्षे बंद आहे. त्याचा वापरच होत नाही. सीप्लेन प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. शिवसेना-काँग्रेसची भूमिका विकासाच्या विरोधात आहे, असा टोला भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांनी लगावला.

टॅग्स :मुंबई