Join us  

भाजपा मुंबईत उभारणार १५० दहीहंड्या

By admin | Published: September 05, 2015 2:14 AM

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा सपाटा लावला असून सत्ताधारी भाजपाने मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा सपाटा लावला असून सत्ताधारी भाजपाने मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपातर्फे १५० हून अधिक ठिकाणी दहीहंडी साजरी केली जाणार असून वांद्रे येथे सर्वात मोठी हंडी उभारण्याची घोषणा पक्षाने केली आहे. रविवारी दहीकाला उत्सवानिमित्त वांद्रे पूर्व येथे राज्यातील सर्वात मोठे दहीहंडी उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावरील या हंडीसाठी मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करण्यात आले आहे. या हंडीच्या निमित्ताने दुष्काळासाठी मदत निधी गोळा करण्यात येणार असल्याचे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी मंत्री, मुंबईतील खासदार, आमदारांसह विवेक आॅबेरॉय, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आदी कलाकार उपस्थित राहणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, पारंपारिक पद्धतीने आनंदाने हा दहीकाला उत्सव साजरा व्हावा सर्वसामान्य जनतेला त्रास न होता आवश्यक त्या परवानग्या घेऊन उत्सव साजरा करावा, असे आवाहन शेलार यांनी केले. याशिवाय, अंधेरी पश्चिम (१) , दिंडोशी (३), अंधेरी पूर्व (८), दहीसर (५), मागाठणे(६), कांदिवली (२), वर्सोवा (४), गोरेगांव (६), मुलूंड (६), घाटकोपर (२) , विलेपार्ले (४), चांदिवली (३), कलिना (२), वांद्रे (३०), धारावी (२), वडाळा (३), सायन (२), माहिम (४), शिवडी (१) यासह ठिकठिकाणी भाजपातर्फे १५० ठिकाणी दहीहंडी चा कार्यक्रम होणार असून त्यात १२ ठिकाणी मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे.