BJP should contest on its own -Workers | लोकमत सर्वेक्षण : भाजपने स्वबळावर लढवावी विधानसभा; कार्यकर्त्यांचा आग्रह
लोकमत सर्वेक्षण : भाजपने स्वबळावर लढवावी विधानसभा; कार्यकर्त्यांचा आग्रह

मुंबई : विधानसभेच्या निवडणुका काही आठवड्यांवर असताना भाजप-शिवसेना युतीचे नेमके काय होणार, याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांचे नेते स्वतंत्रपणे यात्रा काढून जनतेत जात आहेत. निवडणुकांच्या वातावरणनिर्मितीमध्ये या दोन्ही पक्षांनी आघाडी घेतली असली तरी युतीबाबत अद्याप ‘फॉर्म्युला’ निश्चितच झालेला नाही. ‘लोकमत’ने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात भाजपच्या ५५ टक्क्यांहून अधिक कार्यकर्त्यांनी स्वबळावरच निवडणूक लढवावी, असा कौल दिला आहे. तर शिवसेनेचे ५७ टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते हे युतीसाठी आग्रही असल्याचे चित्र या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने राज्यातील २८८ मतदारसंघांतील सुमारे लाखभर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची युतीबाबत मते जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीसाठी आग्रही असलेले भाजप कार्यकर्ते आता स्वबळाची भाषा करत असल्याचे दिसून आले. लोकसभेपूर्वी स्वबळाचा नारा देणारे शिवसैनिक विधानसभेसाठी मात्र युती व्हावी, या मतावर आले आहेत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेवर निघाले. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आल्यानंतर ‘कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत युती होणारच’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. मात्र शिवसेना नेत्यांना त्याबाबत खात्री वाटत नाही. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे.

दोन्ही पक्ष वेगळे लढल्यास मतविभाजन होईल, असा शिवसैनिकांचा सूर आहे. तर भाजपला सध्या पोषक वातावरण असल्याने सेनेसोबत जाण्याऐवजी स्वतंत्र निवडणूक लढविणे जास्त योग्य ठरेल, असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. दोन्ही पक्षांची युती झाली तर त्याचा फायदा शिवसेनेलाच जास्त होईल, असा कौल दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. तर भाजपमधील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता भाजपसाठी हे पाऊल बंडखोरीचा धक्का देणारे ठरू शकते, असे मत समोर आले आहे. २०१४ मध्ये दोन्ही पक्षांनी वेगवेगळी चूल मांडली होती. त्या वेळी भाजप १२२ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनला होता, तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या.

काय आहे सर्व्हेमध्ये?
‘लोकमत’च्या सर्वेक्षणानुसार येत्या विधानसभा निवडणुकांत भाजपचे ४३.२६ टक्के कार्यकर्तेच युतीसाठी आग्रही आहेत. तर शिवसेनेच्या ४२.१५ टक्के कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात कौल दिला आहे. युती झाली तर भाजपला कमी व शिवसेनेला जास्त फायदा होईल, असाच दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा सूर आहे. सेनेला फायदा होईल असे ५८.५२ टक्के कार्यकर्ते मानतात. तर भाजपला फायदा होईल असा ४१.४८ टक्के कार्यकर्त्यांनी कौल दिला आहे.

दोघांची युती झाली तर फायदा कुणाला?
41.48% - भाजपला फायदा
58.52% - शिवसेनेला फायदा

55.92%- भाजप कार्यकर्त्यांना युती नको
43.26%- भाजप कार्यकर्ते युतीसाठी आग्रही
42.15%- शिवसैनिकांना युती नको
57.85%- शिवसैनिकांना युती हवी


Web Title: BJP should contest on its own -Workers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.