Join us  

बंडखोरांमुळेच भाजपाचा घात

By admin | Published: April 27, 2015 4:34 AM

युतीबद्दल नाराजी असतानाच उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेच्या ४१ इच्छुकांनी बंडखोरी केली होती. त्यापैकी ९ जणांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईयुतीबद्दल नाराजी असतानाच उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेच्या ४१ इच्छुकांनी बंडखोरी केली होती. त्यापैकी ९ जणांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. त्याचा फटका भाजपालाही बसला असून त्यांना ५ प्रभागांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपासोबत युती नको असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतरही वरिष्ठ स्तरावरून ही युती घडवून आणली गेली. परिणामी तिकीट वाटपात झालेल्या घोळामुळे सेनेच्या ४१ जणांनी बंडखोरी केली होती. तिकीट वाटपाची जबाबदारी असलेल्या नेत्यांवर आरोप करत या बंडखोरांची आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसेल अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतरही या बंडखोरांची समजूत काढण्याऐवजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली. याचा फटका शिवसेनेपेक्षा मित्रपक्ष असलेल्या भाजपालाच सर्वाधिक बसला. या बंडखोर उमेदवारांनी ४१ पैकी ९ प्रभागांमध्ये विजयी उमेदवाराच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. तर घणसोली येथील प्रभाग ३१ मध्ये बंडखोराने शिवसेनेच्याच उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. युतीचे उमेदवार दुसऱ्या अथवा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. बंडखोरांनी युतीच्या उमेदवारांना साथ दिली असती तर भाजपाला आणखी पाच जागा जिंकता आल्या असत्या. यात प्रभाग क्रमांक ९, १५, २८, २९ व ४४ चा समावेश आहे. त्याचप्रमाणे ७३ व ७६ या दोन जागांवर बंडखोरांमुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला.