Join us  

भाजप-ओमी कलानींचा शिवसेनेला दे धक्का, उल्हासनगर महापालिका परिवहन समिती सभापती पदी सुभाष तनावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 5:18 PM

निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काम पाहिले आहे.

सदानंद नाईक

उल्हासनगर: महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजप-ओमी कलानी यांनी शिवसेनेला धक्का देत भाजपचे सुभाष तनावडे यांची सभापती पदी निवडुन आणले. तनावडे यांनी शिवसेना समर्थक इंदर गोपलानी यांचा एका मताने पराभव केला. निवडणुक पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काम पाहिले आहे.

उल्हासनगर महापालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता महासभा सभागृहात पार पडली. भाजप कडून सुभाष तनावडे तर शिवसेनेकडून इंदर गोपलानी एकमेका विरोधात उभे ठाकले होते. परिवहन समिती मध्ये शिवसेनेचे-५, राष्ट्रवादी पक्षाचा-१ तर भाजपचे -७ असे संख्याबळ आहे. भाजपातील ७ पैकी २ सदस्य कलानी समर्थक असून त्यापैकी दिनेश लहरानी शिवसेनेच्या मदतीने गेल्या वेळी सभापती पदी निवडून आले होते. निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर होते. यावेळी निवडणूक नोडल अधिकारी संतोष दहेरकर, प्रांत अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार कोमल ठाकूर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदीजन उपस्थित होते. भाजप समर्थक सुभाष तनावडे यांना-७ तर शिवसेना समर्थक इंदर गोपलानी यांना-६ मते मिळाली. ओमी कलानी यांनी शिवसेनेला धक्का देत समर्थक दोन सदस्याच्या मदतीने भाजपच्या तनावडे यांना सभापती पदी निवडून आणले.

शहरात शिवसेना व कलानी कुटुंबाचे गळ्यातगळे सुरू असताना कलानी समर्थक दोन सदस्यांनी शिवसेने ऐवजी भाजप समर्थक सुभाष तनावडे यांना मतदान केले. कांबा गावाचे उपसरपंच यांना शिवसेनेने फोडून पक्षात प्रवेश दिला. याचा वचपा म्हणून स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का देऊन उष्टे काढल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी दिली. तर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कलानी समर्थक सदस्यांनी शिवसेना समर्थक उमेदवारा ऐवजी भाजप उमेदवार तनावडे यांना मतदान केल्याची प्रतिक्रिया दिली. भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र हा विजय माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची तर खासदार श्रीकांत शिंदे यांची हार असल्याची प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्हे

शहरातील कलानी कुटुंबाने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्याने, शहाराध्यक्ष पदाची माळ पंचम कलानी यांच्या गळ्यात पडली. तर पेरॉलवर असलेले पप्पु कलानी यांनी महाआघाडीचे समन्वय म्हणून काम करीत असल्याचे अनेकदा सांगितले. मात्र परिवहन समिती सभापतीं पदाच्या निवडणुकीत कलानी समर्थक दोन सदस्यांनी शिवसेने ऐवजी भाजप उमेदवाराला मतदान केल्याने, महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

टॅग्स :उल्हासनगर