Join us  

भाजपा प्रदेश कार्यालयात आधी जल्लोष, मग शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:39 AM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जोरदार जल्लोष करण्यात आला.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जोरदार जल्लोष करण्यात आला. दुपारी १च्या सुमारास भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे चित्र होते. त्यामुळे ढोलताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत भाजपा नेत्यांनी विजय साजरा केला, परंतु थोड्याच वेळात भाजपाला स्वबळासाठी काही जागा कमी पडत असून, काँग्रेस आणि जनता दलाने एकमेकांशी हातमिळवणी केल्याच्या बातम्या झळकू लागल्यानंतर जल्लोषाचे रूपांतर शांततेत झाले. तत्पूर्वी, कर्नाटकातील यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार भाई गिरकर, सरदार तारासिंग, राज पुरोहित यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा व कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करण्यात आले.धारावीत जल्लोष लांबणीवरकर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पुढे आली असली तरी स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने धारावीतील पक्ष कार्यकर्त्यांनी केलेली जल्लोषाची तयारी वाया गेली आहे. मात्र, सायंकाळी जल्लोषाचा बेत रद्द करण्यात आला. पण, कर्नाटकात भाजपाचा मुख्यमंत्री सत्तारूढ झाल्यावर खऱ्या अर्थाने भव्य जल्लोष करण्यात येईल, अशी माहिती मनिबालन व पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संतोष शर्मा यांनी दिली.