आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?; भाजपाचा शिवसेनेला प्रतिटोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:38 AM2022-05-17T08:38:12+5:302022-05-17T08:39:12+5:30

बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही अशा शब्दात भाजपाने सामना अग्रलेखाचा समाचार घेतला आहे.

BJP Keshav Upadhye Counter Attack on Shiv Sena criticism in Saamana Editorial | आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?; भाजपाचा शिवसेनेला प्रतिटोला

आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?; भाजपाचा शिवसेनेला प्रतिटोला

Next

मुंबई – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागलं आहे. शिवसेनेने सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत ते रामाचे नाव घेतात आणि बिभीषणाप्रमाणे वागतात असा आरोप केला. मात्र आता याच आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye_ यांनी आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण? असा प्रतिटोला शिवसेनेला लगावला आहे.

भाजपानं म्हटलं की, ‘सामना’चे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते  देवेंजींना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात, अहो, बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही. रावणाने जो अत्याचार केला त्याविरोधात जाऊन ते प्रभू रामाच्या सैन्यासोबतच रावणाविरोधात युद्धात उभे राहिले. वाईट मार्गाला लागलेल्या भावालाही त्याने सोडले नाही. तुम्ही इतकी वर्ष याच बिभीषणासोबत एकत्र होता. मग तुम्ही कोण ‘रावण’? हो हेच सत्य आहे असं त्यांनी टोला लगावला आहे.

तर भ्रष्टवाद्यांना हाताशी धरून तुम्ही राज्याचा कारभार रसातळाला नेला. खुलेआम वसुली होऊ लागली. बदल्यांचे रॅकेट तयार झाले. पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या करण्यापर्यंत मजल गेली. राज्याच्या कारभाराचे तीन तेरा वाजले. तुमच्या अहंकाराची लंका जाळून हा बिभीषण महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी लढतोय. त्यामुळे वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असंही केशव उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सामना अग्रलेखात काय म्हटलं?

उत्तर भारतीय श्रीराम व हनुमानाचे भक्त आहेत. श्रीरामाचे वास्तव्य महाराष्ट्रात होते. नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत. राज्य सोडावे लागले तेव्हा श्रीरामाने तो निर्णय स्वीकारला. त्यांना वैफल्य आले असे रामायणात कोठेच दिसत नाही. सीतामाईनेही तो निर्णय स्वीकारला हे विशेष, पण फडणवीसांची रामभक्ती तकलादू आहे. नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे असा निशाणा सामना अग्रलेखातून शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) साधला आहे.

Web Title: BJP Keshav Upadhye Counter Attack on Shiv Sena criticism in Saamana Editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.