गौरीशंकर घाळे, मुंबईमतदारसंघ पुनर्रचनेत पूर्वीचा कांदिवली मतदारसंघ मालाड पश्चिम आणि चारकोप अशा दोन मतदारसंघांत विभागला. काँग्रेसच्या या परंपरागत मतदारसंघाची विभागणी जणू एक भाग काँग्रेस आणि दुसरा भाजपाकडे अशीच झाल्याचे चित्र आहे. मालाडमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख तर चारकोपमधून भाजपाचे योगेश सागर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. मिश्रवस्तीच्या चारकोप मतदारसंघात सर्व समाजघटकांचा भरणा पाहायला मिळतो. इस्लाम कंपाउंड, लालजी पाडा हा झोपडपट्टीचा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा भरणा असणारा परिसर. तर मथुरादास रारेड, शंकर गल्ली अशी एकदम दुसऱ्या टोकाची उच्चभ्रू लोकांची वस्ती. या जोडीलाच नव्याने जोडण्यात आलेला अलीकडच्या काळात तयार झालेला चारकोपचा मध्यमवर्गीय, मराठी लोकवस्ती मतदारसंघात पाहायला मिळते. २००९ साली झालेल्या पहिल्याच लढतीत येथून भाजपा उमेदवार योगेश सागर यांनी १६ हजार ३६३ मतांनी दणदणीत विजय मिळवला. सागर यांना एकूण ५८ हजार ६८७ मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भारत पारेख यांना ४२ हजार ३२४ मतांवर समाधान मानावे लागले. तर मनसे उमेदवार दीपक देसाई यांनी २३ हजार २६१ मते घेत तिसरे स्थान मिळवले. स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांची संघटनात्मक रचना पाहायला मिळते. कांदिवली पश्चिमपासून मथुरादास रोड, लालजी कंपाउंडसारखा भाग भाजपाचा तर इस्लाम कंपाउंड, लालजी पाडा काँग्रेससाठी हक्काचा. पण सलग नऊ वर्षे नगरसेवकपदी असणाऱ्या योगेश सागर यांनी चारकोपचा पहिला आमदार होण्याचा मान पटकाविला. विधिमंडळाच्या कामकाजात सातत्यपूर्ण आणि नियमित सहभाग घेणाऱ्या आमदारांमध्ये योगेश सागर यांचा समावेश होतो. अनेकदा केवळ आपला प्रश्न अथवा चर्चा असेल तरच उपस्थित राहण्याकडे आमदारांचा कल पाहायला मिळतो. त्यानंतर एखादा महत्त्वाचा विषय, पक्षाचा व्हिप असेल तरच सभागृहात उपस्थित राहण्याची परंपरा बहुतांश आमदार बजावताना दिसतात. मात्र, एखाद्या आज्ञाधारक, शाळकरी मुलाप्रमाणे सभागृह सुरू झाल्यापासून दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत योगेश सागर उपस्थित असल्याचे चित्र अनेकदा पत्रकारांनी पाहिलेले आहे. अनेकदा विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमदारांचा मतदारसंघातील वावर आणि जनसंपर्काकडे दुर्लक्ष झाल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. योगेश सागर यांनी मात्र मतदारसंघातील संपर्क जाणीवपूर्वक जपला आणि वाढविला. असे असले तरी आमदारकीच्या कालखंडात चारकोपमध्ये विशेष विकासकामे झाली असे चित्र नाही. सांडपाणी, स्वच्छतागृहे अशी कामे मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, डिंगेश्वर तलाव वगळता आमदाराचा म्हणून विशेष प्रकल्प झाले नाहीत. काही उद्यानांचे सुशोभीकरणही झाले. मात्र, एस.व्ही. रोडवर होणारी प्रचंड वाहतूककोंडी, मथुरादास रोड, शंकर गल्ली परिसरात वाढत्या वाहनांमुळे होणारी गर्दी, गोंधळ तसाच राहिला. भाजपाकडून योगेश सागर यांचे नाव नक्की मानले जात आहे. मुंबईतील भाजपासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चारकोपचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना येथून तब्बल ८० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे सध्या तरी हा मतदारसंघ भाजपासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेसला सक्षम उमेदवारासाठीही शोधाशोध करावी लागणार असल्याचे दिसते. भारत पारेख आणि अलीकडेच भाजपातून काँग्रेसवासी झालेल्या पारुल मेहतांच्या नावाची चर्चा आहे. नगरसेवक असणारे राम गुप्ताही इच्छुक आहेत. मात्र, लोकसभेचे ८० हजारांचे मताधिक्य तोडून विजयासाठीची मते घेण्याचे अवघड काम काँग्रेस उमेदवारासमोर आहे. भरीसभर म्हणून इस्लाम कंपाउंड, लालजी पाडासारखा भाजपासाठी प्रतिकूल वस्त्यांमध्ये योगेश सागर यांनी आपली जनसंपर्क कार्यालये उघडली आणि जाणीवपूर्वक या भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एकूणच मतदारसंघ सध्या भाजपासाठी अनुकूल असल्याचे चित्र असून मागील निवडणुकीइतकी मते घेण्यासाठीही काँग्रेसला बरीच मेहनत करावी लागणार आहे. मोदी लाट ओसरली अथवा भाजपासाठी अनुकूल असणाऱ्या भागातून मतदानाची टक्केवारी घसरली, तरच काँग्रेसला काही आशा आहे.
भाजपासाठी अनुकूल वातावरण
By admin | Updated: August 29, 2014 01:06 IST