Join us  

बीएनएचएसने टॅग केलेले पक्षी ‘आक्षी’जवळ आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 5:03 AM

पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाला मदत : पक्षी पुन:पुन्हा दिसण्याचे प्रमाण वाढले

सागर नेवरेकर मुंबई : ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’(बीएनएचएस)ने पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या उद्देशाने मुंबईतील सुमारे चार हजार स्थलांतरित पक्ष्यांना रिंग आणि टॅग केले होते. त्यातील काही स्थलांतरित पक्षी १० जानेवारी रोजी अलिबागजवळील आक्षी बीच येथे आढळून आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक (शिक्षण) डॉ. राजू कसंबे आणि पक्षी निरीक्षक वेदांत कसंबे यांनी या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करून छायाचित्रे टिपली आहेत. आक्षी बीच येथे दीड तासांत सात टॅग लावलेले पक्षी निदर्शनास आले आहेत. या निरीक्षणामुळे पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाला मदत होणार आहे.

बीएनएचएस स्थलांतरित पक्ष्यांना टॅगिंग करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू व चिलिका इत्यादी राज्यात टॅगिंग पद्धत अवलंबली जात आहे. फ्लॅग ही एक नवी पद्धत टॅगिंगमध्ये अंमलात आणली जाते. टॅगिंग केलेले पक्षी पुन:पुन्हा दिसणे. याचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल जलद व अधिक माहिती उपलब्ध होण्यास मदत होत आहे. मी व माझा मुलगा वेदांतने मागच्या वर्षी नवी मुंबईत एका दिवसात ५७ पक्षी टॅग लावले, शोधले. आक्षी बीचवरील ७०० ते १ हजार स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण केल्यानंतर सात टॅग लावलेले स्थलांतरित पक्षी दिसून आले, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक (शिक्षण) डॉ. राजू कसंबे यांनी दिली.

टॅगिंग केलेले पक्षी शोधण्यासाठी बारीक नजर लागते. त्यामुळे अशा पक्ष्यांना शोधण्याचे खूप कठीण काम आहे. दीड तासानंतर सात टॅग लागलेले पक्षी निदर्शनास आले. नुसते छायाचित्र काढल्याने पक्ष्यांबद्दल पूरक माहिती उपलब्ध होत नाही. टॅगिंग केलेल्या पक्ष्यांना याआधी आक्षी बीचवर सोडण्यात आले होते आणि आता ते पुन्हा त्याच ठिकाणी दिसून आले. म्हणजेच अजून ते कुठेही गेलेले नाहीत. थोडी गर्मी वाढल्यावर ते स्थलांतरित पक्षी दुसऱ्या ठिकाणी निघून जातील, अशी माहिती पक्षी निरीक्षक वेदांत कसंबे यांनी दिली.