Join us  

लॉकडाऊनमधील बिलांचा वीज कंपन्यांनाही शॉक; महावितरणाचे नुकसान होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 1:08 AM

अदानीने सोडले महसुलांवर पाणी

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात पाठवलेल्या सरासरी बिलांनी वीज ग्राहकांना घाम फोडला असतानाच वीज वितरण कंपन्यांनाही त्याचा शॉक बसण्याची चिन्हे आहेत. एकरकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलत आणि विलंब शुल्कावरील व्याज माफीमुळे महावितरणला सुमारे एक हजार कोटींचे नुकसान सोसावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीने विलंब शुल्कावरील व्याजमाफी दिल्यामुळे त्यांना सुमारे १०० कोटींचे नुकसान होईल, तर बेस्टने आपले सुमारे ४० कोटी आणि टाटा पॉवरने ३५ कोटी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी विलंब शुल्कावरील व्याज वसुली सुरूच ठेवली आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांत मीटरचे रीडिंग शक्य नसल्याने सरासरी वीजबिल पाठविण्यात आले. त्यामुळे जेवढा वीज वापर झाला होता त्यापेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के कमी रकमेची बिले ग्राहकांना दिली गेली. जूनमध्ये मीटर रीडिंग घेऊन बिलांचे वाटप झाले. त्यामुळे अनेक ग्राहकांची बिले दोन ते अडीच पटीने वाढली.

देय तारखेनंतर त्या बिलांचा भरणा केल्यास एमईआरसीच्या नियमानुसार विलंब शुल्क आणि त्यावरील व्याज भरणे क्रमप्राप्त मात्र, या वाढीव बिलांमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी व्याज माफ करून तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली. याशिवाय एकरकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलतही देण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या तोट्यात भर पडणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जूनच्या वीजबिलाची भरणा करण्याची मुदत येत्या सात दिवसांत संपेल. त्यानंतर दोन टक्के सवलत किती जणांनी घेतली आणि किती ग्राहकांनी हप्त्याने बिल भरण्याचा पर्याय स्वीकारला हे स्पष्ट होईल. त्याआधारे महावितरणला किती कोटींचा भुर्दंड सोसावा लागेल याचा ताळेबंद मांडता येईल, असेही या आधिकाºयाने स्पष्ट केले.

टाटा, बेस्टच्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता

टाटा आणि बेस्ट या मुंबईकरांना वीजपुरवठा करणाºया दोन कंपन्यांनी विलंब शुल्क आणि त्यावरील व्याज माफ केलेले नाही. एकरकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलतही नाही. सर्व ग्राहकांनी तीन हप्त्यांत पैसे भरले तर विलंब शुल्क आणि व्याजापोटी टाटाच्या ग्राहकांकडून सुमारे ३० ते ३५ कोटी आणि बेस्टच्या ग्राहकांकडून ४० ते ४५ कोटींची अतिरिक्त वसुली होईल, असे वीज अभ्यासकांचे म्हणणे आहे.

वीजबिल एकरकमी भरले तर दोन टक्के सवलत देण्याचे महावितरणने जाहीर केले आहे. मात्र, १० हजार रुपयांचे बिल असले तरी दोन टक्क्यानुसार त्यावर फक्त २०० रुपयांचीच सवलत मिळेल. त्यापेक्षा हे बिल बिनव्याजी तीन हप्त्यांत भरणे जास्त सोईस्कर ठरू शकते. त्यामुळे वीज ग्राहक सवलतीपेक्षा हप्त्यांमध्ये बिलाचा भरणा करण्यास प्राधान्य देतील, असे महावितरणच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :वीजमहावितरण