Join us  

भायखळा मतदारसंघ : चाळींचा पुनर्विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 3:24 AM

भायखळा मतदारसंघातील अनेक चाळींचा पुनर्विकास रखडल्याने मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मुंबई : भायखळा मतदारसंघातील अनेक चाळींचा पुनर्विकास रखडल्याने मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षे चाळींच्या पुनर्विकासासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे. टोलेजंग इमारतीत मध्यमवर्गीयांना घर घेणे आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे दिवसागणिक चाळींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत येथील मतदार आहेत.साधारण शंभर वर्षांपूर्वीच्या चाळी मोडकळीस आल्या आहेत. या भागात पुनर्विकासाने कास धरली आहे. मर्जी आणि स्वार्थ बाळगून पुनर्विकास सुरू आहे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जाते. त्याचा फटका सर्वसामान्य रहिवाशांना बसतो. या मतदारसंघातील माझगाव ताडवाडी येथील चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तब्बल १३ वर्षे रखडलेला आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विकासकाची हकालपट्टी करून येथे पालिकेने दुरुस्ती व डागडुजीचे काम हाती घेतले.माझगाव ताडवाडी येथील १६ बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसा प्रस्ताव सुधार समितीत एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, गेल्या १३ वर्षांत प्रकल्पाची एक वीटही बिल्डरला रचता आली नाही. १६ चाळींमध्ये राहणाºया १ हजार ३६२ रहिवाशांपैकी १८० रहिवाशांना तेथेच संक्रमण शिबिर बांधून देण्यात आले, तर धोकादायक ठरलेल्या पाच इमारती पाडून २२० रहिवाशांची रवानगी माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीत करण्यात आली आहे. इतर रहिवासी अद्याप चाळीतच राहत आहेत. पुनर्विकासासाठी पाच इमारती तोडण्यात आल्या असून, एका इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. इतर इमारती ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. प्रकल्प रद्द करण्यात आल्याने पुनर्विकासाला विरोध करणाºया रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. आता या पुनर्विकासाला आणखी किती वर्षे लोटणार, हा सवाल त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या मतदारसंघातील म्हाडांतर्गत पीएमजीपी योजनेतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, टेकूंवर तग धरून असलेल्या उपकरप्राप्त चाळी, बिल्डर अर्धवट काम सोडून पळालाय, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न यांनी भेडसावलेल्या भाडेकरूंच्या चिंतेतही दिवसागणिक भर पडत आहे.गृहस्वप्न अधांतरीचचाळींतून टॉवरमध्ये जाण्याचे मध्यमवर्गीय घटकाचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. गेली अनेक वर्षे पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र त्यासाठी पुरेसा प्रयत्न होताना दिसून येत नाही, अजूनही दहा बाय दहाच्या खोलीत राहावे लागते आहे, पालिकेने आता डागडुजी करून चाळींचे आयुर्मान वाढविले आहे. परंतु, मध्यमवर्गीय चाळकऱ्यांचे टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न अंधातरीच आहे.- राजा मयेकर, मतदार 

टॅग्स :बायकुलामुंबई