Join us  

बेस्ट कामगार पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत, पालिकेने अर्थसंकल्पात दाखवला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:50 PM

पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात ठेंगा दाखविल्याने आर्थिक संकटात असलेल्या बेस्टची पुन्हा पंचाईत झाली आहे. त्यामुळे दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आश्वासन देणाºया प्रशासनाला आपला शब्द या महिन्यात पाळता आलेला नाही.

मुंबई : पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात ठेंगा दाखविल्याने आर्थिक संकटात असलेल्या बेस्टची पुन्हा पंचाईत झाली आहे. त्यामुळे दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आश्वासन देणाºया प्रशासनाला आपला शब्द या महिन्यात पाळता आलेला नाही. यामुळे बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सोमवारी १२ तारखेपर्यंत पगार न झाल्यास कामगार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.गेल्या वर्षी ७ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप १६ तास चालला होता. हा संप मिटण्यासाठी दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी पालिकेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती. तरीही पालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिले नाही. मात्र गेले पाच महिने पगार ठरलेल्या वेळेत देणाºया बेस्ट प्रशासनाने जानेवारी महिन्याचा पगार अद्याप दिलेला नाही. सोमवारपर्यंत बेस्ट कामगारांच्या बँक खात्यात पगार जमा होणे अपेक्षित आहे.मात्र या विलंबाने बेस्ट कामगार धास्तावले आहेत. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाची महापालिकेवर मदार होती. त्याप्रमाणे पालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. त्यानुसार सन २०१८-२०१९च्या अर्थसंकल्पात पालिका बेस्टसाठी ३४० कोटी रुपयांची तरतूद करणार होती. प्रत्यक्षात पालिकेने अर्थसंकल्पातून बेस्टला कोणताच दिलासा दिलेला नाही. तसेच बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचीही चिन्हे नाहीत. त्यामुळे तुटीत असलेला बेस्टचा अर्थसंकल्प मंजुरीविना रखडणार आहे.निदर्शने करणार : बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक आणि वीजपुरवठा विभागात एकूण ४४ हजार कामगार-कर्मचारी आहेत. यापैकी ३६ हजार वाहतूक विभागात आहेत. त्यांच्या वेतनापोटी दरमहा १२० कोटी रुपयांची तजवीज बेस्ट प्रशासनाला करावी लागते. दररोजचे बेस्टचे उत्पन्न सुमारे अडीच कोटी आहे. सणासुदीत प्रवासी संख्या वाढत असल्याने हे उत्पन्न तीन कोटींपर्यंत पोहोचते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच बेस्ट कामगारांचे पगार प्रत्येक महिन्यात २० तारखेनंतर होऊ लागले होते. पुन्हा तीच वेळ येण्याची शक्यता असल्याने सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी वडाळा बस आगारात दुपारी ३नंतर कामगार निदर्शने करणार आहेत.

टॅग्स :मुंबई