The Best Workers Span On The Long Term | बेस्ट कामगारांचा संप तूर्तास लांबणीवर
बेस्ट कामगारांचा संप तूर्तास लांबणीवर

मुंबई : बेस्ट कामगारांच्या कृती समितीने पुकारलेल्या संपाविरोधात प्रशासनाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ९ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच कृती समिती संपाबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
सुधारित वेतनश्रेणीच्या सामंजस्य करारावर शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेना व अन्य संघटनांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र बेस्ट वर्कर्स युनियन व अन्य संघटनांनी या करारावर सही न केल्यामुळे त्यांचे सदस्य असलेल्या कामगारांना सानुग्रह अनुदान व वाढ नाकारली जाऊ लागली. या कराराला विरोध करीत कृती समितीने ९ आॅक्टोबरपासून संप पुकारण्याचा इशारा दिला होता. या संपाविरोधात बेस्ट प्रशासनाने औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
याआधी जानेवारी महिन्यात कामगार संघटनांनी नऊ दिवस संप केला होता. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने मध्यस्थी नेमल्यानंतरही बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमधील वाटाघाटी असफल ठरल्या होत्या. या वेळेस बेस्ट प्रशासनाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. तसेच कामगार आयुक्तांकडेही १४ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कामगार आयुक्त काय निकाल देतात, यावर संपाचा निर्णय अवलंबून असेल, असे कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले.

Web Title:  The Best Workers Span On The Long Term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.