Join us  

बेस्टची सेवा वेगवान व्हायला हवी - अरुण नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:57 PM

मुंबईत प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छितस्थळी पोहोचायचे असते. बेस्टच्या बस वेळेत येत नाहीत.प्रवासी अन्य पर्याय निवडतात.

मुंबई : मुंबईत प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छितस्थळी पोहोचायचे असते. बेस्टच्या बस वेळेत येत नाहीत.प्रवासी अन्य पर्याय निवडतात. बेस्टने आपली सेवा वेगवान करायला हवी, असे मत अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘नागरिकांचा मंच, आमची मुंबई आमची बेस्ट’ यांच्या वतीने मुंबईत सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल नलावडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला़ त्या वेळी ते बोलत होते. या अहवालामध्ये विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या वेळी निवृत्त न्यायाधीश होसबेट सुरेश, ‘आमची मुंबई आमची बेस्ट’चे समन्वयक विद्याधर दाते आदी मान्यवर उपस्थित होते.नलावडे म्हणाले, मुंबईकरांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचायचे असते. बस वेळेत येत नाही. प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. ते रिक्षा, टॅक्सी किंवा इतर पर्यायांची निवड करतात. बेस्टपेक्षा रेल्वेची सेवा चांगली आहे. अनेक जण रेल्वेला प्राधान्य देतात. मेट्रो सुरू होणार आहे़ बेस्टची सेवा बंद होईल असे म्हटले जाते. मेट्रोपूर्वी बेस्ट बंद झाल्यास ते घातक ठरेल, असे ते म्हणाले.सार्वजनिक वाहतूक हा मानवी हक्कज्याप्रमाणे प्रत्येकाला स्वातंत्र्याचा, जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्याप्रमाणे चांगला प्रवास होणे, प्रवासासाठी वाहतुकीची चांगली व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. घटनेच्या २१ व्या कलमानुसार सार्वजनिक वाहतूक हा मानवी हक्क आहे, हा जीवनाच्या अधिकाराचा भाग आहे, असे निवृत्त न्यायाधीश होसबेट सुरेश यांनी सांगितले.वाहतूककोंडीमुळे वाहन चालक आणि वाहकांवर कामाचा ताण वाढला आहे, असे अहवालातून समोर आले आहे.