Join us  

बेस्ट बस वेळेवर येत नाही; प्रवाशांकडून तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:28 AM

बसचालक व वाहक यांचे गैरवर्तन, वेळेनुसार धावत नसलेल्या गाड्या, बसथांब्याची दुरवस्था, रॅश ड्रायव्हिंग इत्यादी समस्या बेस्ट प्रवाशांच्या असून, या समस्या सोडविण्यात बेस्ट प्रशासन अपयशी ठरत आहेत.

मुंबई : बसचालक व वाहक यांचे गैरवर्तन, वेळेनुसार धावत नसलेल्या गाड्या, बसथांब्याची दुरवस्था, रॅश ड्रायव्हिंग इत्यादी समस्या बेस्ट प्रवाशांच्या असून, या समस्या सोडविण्यात बेस्ट प्रशासन अपयशी ठरत आहेत. कन्झ्युमर गाइडन्स सोसासटी आॅफ इंडिया (सीजीएसआय)ने आॅगस्ट महिन्यापासून बेस्ट प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मोहीम सुरू केली. आतापर्यंत सीजीएसआयकडे ३५ ते ४० बेस्ट प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, परंतु बेस्ट प्रशासन या तक्रारीचे निराकरण कधी करणार? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.मालाड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या गाड्या वेळेनुसार धावत नाही. बस क्रमांक १२२ ही गाडी रात्रीच्या वेळेस खूप उशिराने येते. प्रवाशांना रात्री ८ नंतर ताटकळत उभे राहावे लागते. विशेषत: महिलांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. बेस्ट प्रशासनाने रात्री जादा बसगाड्या सोडाव्यात, जेणेकरून प्रवाशांचा ताण कमी होईल. बांगुरनगर येथील बसथांब्यावर बस क्रमांक २५९ ही गाडी थांबा न घेता पुढे जाते. दत्तानी पार्क ते कुर्ला स्थानकादरम्यान बसगाड्यांची फ्रिक्वेन्सीकडे बेस्ट प्रशासनाने लक्ष द्यावे. पूनम दर्शन बिल्डिंग बसस्टॉप ते अंधेरी (पूर्व) रेल्वे स्थानक (बस क्रमांक ३०८) हा ३.९ किलोमीटरचा प्रवास आहे. बेस्टने भाडेकपात केल्यापासून तिकीट दर पाच रुपये घेणे अनिवार्य असताना, प्रवाशांकडून तिकिटांचे १० रुपये आकारले जातात, अशा बेस्ट संदर्भातल्या तक्रारी प्रवाशांनी कन्झ्युमर गाइडन्स सोसासटी आॅफ इंडिया यांच्याकडे केल्या आहेत.सरचिटणीस डॉ. मनोहर कामत म्हणाले की, बेस्ट प्रशासनाच्या वक्तशीरपणाबाबत प्रवाशांनी जास्त तक्रारी केल्या आहेत. बेस्ट प्रशासनही हळूहळू प्रवाशांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकडे लक्ष देऊ लागली आहे, त्यांच्यामध्ये अजूनही वक्तशीरपणा दिसून येत नाही.