मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 16:43 IST2025-12-07T16:40:24+5:302025-12-07T16:43:42+5:30
Mumbai Municipal Corporation Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदार आणि मृत मतदारांच्या नोंदी हे मु्द्दे चांगलेच गाजत आहेत. त्याचदरम्यान, मुंबईतील मतदार यादीबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदार आणि मृत मतदारांच्या नोंदी हे मु्द्दे चांगलेच गाजत आहेत. त्याचदरम्यान, मुंबईतील मतदार यादीबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एकूण २२७ वॉर्डमधील मतदारांच्या संख्येमध्ये एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र ही वाढ सर्व विभागात समप्रमाणात झालेली नाही, तर पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर मुंबईचा मुख्य भाग मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या भागांमध्ये मतदारांची संख्या घटलेली दिसत आहे.
मतदार यादीच्या ड्राफ्टमधून मुंबईमधील मतदारांच्या संख्येमध्ये झालेले काही प्रमुख बदल अधोरेखित झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार २०१७ नंतर संपूर्ण मुंबईमध्ये मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. मात्र या वाढीमध्ये प्रभागनिहाय असमानता दिसून येत असून, प्रत्येत प्रभागात ही वाढ वेगवेगळी नोंदवली गेली आहे.
मतदारांच्या संख्येमधील सर्वाधिक बदल हा पश्चिम उपनगरांमधील मालाड-मालवणी परिसरात आणि मध्य मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये दिसून आला आहे. पी उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक ४८, ३३, १६३ आणि १५७ मध्ये मतदारांच्या संख्येमध्ये ५० टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली आहे. या परिसरामध्ये मुख्यत्वेकरून वर्किंग क्लास आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकसंख्येचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या आकडेवारीवर राजकीय आणि प्रशासनिक स्तरावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. एकूणच मतदार संख्येत सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेलेल्या पहिल्या ५ प्रभागांपैकी तीन प्रभाग एकट्या पी-उत्तर विभागात आहेत.
दुसरीकडे मूळ किंवा जुनी मुंबई मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून आली आहे. मुंबई मनपा क्षेत्रातील एकूण २४ प्रभागांमध्ये मतदारांची संख्या घटली आहे. त्यातील १० प्रभाग उपनगरांमध्ये आहेत. तर १४ प्रभाग हे शहरामध्ये आहेत. शहरातील काळबादेवी, चिरा बाजार येथून पुनर्विकास आणि शहराच्या बाहेर नवी घरं मिळाल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं आहे.
दरम्यान, मतदार यादीत दिसत असलेल्या बदलांचं मुख्य कारण हे मतदार यादीतील सफाई हे असल्याचं दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि निवडणूक आयोगाने सुनारे ११ लाख दुबार मतदारांना मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया राबवली आहे त्यामुळे अनेक भागात मतदारांचे आकडे अचानक कमी दिसू लागले आहेत. तर नव्या मतदारांचा समावेश आणि अंतर्गत स्थलांतर आणि नव्या बांधकाम प्रकल्पांमुळे मतदारांचे प्रमाण कमी अधिक झाले आहे. दरम्यान, मतदार यादीतील बदलांचा थेट परिणाम मुंबई महानगरपालिकेमधील वॉर्ड स्तरीय लढतींवर होऊ शकतो. तर मसुदा यादीवरील आक्षेप आणि सुधारणांनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.