Join us  

संशोधनात सातत्य ठेवा, शिस्त पाळा, निरीक्षणे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 5:14 AM

मिळून साऱ्या जणी : महिला शास्त्रज्ञांचा तरुण शास्त्रज्ञांना महामंत्र; मुलींनी संशोधनाच्या क्षेत्रात उतरणे गरजेचे

मुंबई : कोणतेही स्वातंत्र्य नीट जपले नाही तर हातून निसटू शकते. संशोधनात शिस्त पाळली पाहिजे. अपेक्षेपेक्षा वेगळे निरीक्षण आले तरी नोंदी ठेवायला पाहिजेत. मुलींनी संशोधन क्षेत्रात यावे, अशी महिला शास्त्रज्ञांना वाटते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महिला शास्त्रज्ञांच्या भरीव कामगिरीवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला असून, यासाठी ‘मराठी विज्ञान परिषदे’ने मोलाचे सहकार्य केले.शुभदा चिपळूणकर : शुभदा चिपळूणकर यांना संशोधनामुळे प्रतिकारक्षमता शास्त्रात (इम्युनॉलॉजी) जोरकसपणे काम करण्याची उमेद मिळाली. आयुष्याची २५ वर्षे त्यांनी संशोधनासाठी घालवली. ट्युमर (कॅन्सरच्या गाठी), कावीळ, कावीळजन्य कर्करोग आणि कुष्ठरोग आदी विषयांवर त्यांनी संशोधन केले. आज त्या समाधानी असून, आपल्या कार्यक्षमतेविषयी विश्वास बाळगून आहेत.नीलिमा गुप्ते : १९७० च्या दशकात नीलिमा गुप्ते मुंबईत एम.एस्सी. करीत होत्या. त्या वक्रपृष्ठांचे गतिशास्त्र आणि संख्यात्मक स्थितिगतिशास्त्र या विषयांत संशोधन करीत आहेत. कोणतेही स्वातंत्र्य हे नीट जपले नाही, तर हातून निसटण्याचा दाट संभव असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.रोहिणी गोडबोले : १९७९ साली पीएच.डी.नंतर रोहिणी गोडबोले यांना युरोपमध्ये कामाची संधी मिळत असतानाही ती अव्हेरून त्या भारतात परतल्या. त्यांनी मुंबईत टी.आय.एफ.आर.मध्ये तीन वर्षे संशोधनाचे काम केले. एक शास्त्रज्ञ म्हणून आपला जीवनप्रवास अतिशय चित्तवेधक, आल्हाददायक ठरला, असे त्यांना वाटते. म्हणूनच मुलींनी संशोधनाच्या क्षेत्रात यावे, यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.प्रियदर्शिनी कर्वे : महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रियदर्शिनी कर्वे या नात आहेत. आनंद कर्वे या शास्त्रज्ञाची कन्या. उसाच्या चिपाडापासून कोळसानिर्मिती या संकल्पनेवर त्यांनी काम केले. २००३ ते २००५ या दोन वर्षांत जनसामान्यांच्या संस्था स्थापून खेड्यातील ७५ हजार घरांमध्ये धूर होत नसलेल्या चुली बाजारभावाने विकल्या. आपले काम जनसामान्यांचे जगणे सुखावह करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते, याचे त्यांना समाधान वाटते.रजनी भिसे : कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात रजनी भिसे यांनी जीवरसायन शास्त्राच्या शाखेत तात्पुरती शाखा कुलगुरूंच्या सौजन्याने उघडली. येथे काम करताना त्यांच्या लक्षात आले की, विडी कामगार स्त्रियांना श्वसनाचे आजार, कर्करोग होण्याचा मोठा धोका आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर, लायन, फ्रान्स यांनी त्यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण पुरावा देणारा अभ्यास म्हणून मान्य केला आहे.सुलभा पाठक : मायक्रोबायॉलॉजी विषय घेऊन सुलभा पाठक या एम.एस्सी झाल्या. महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. शिकवत असतानाच त्यांनी नोट्स इन मायक्रोबायॉलॉजी हे पुस्तक लिहिले. मुंबईत एका औषधी कंपनीत रिसर्च कन्सल्टंट म्हणून काम केले आहे.यांचेही योगदान मोलाचेसत्यवती शिरसाट : कराची येथे सत्यवती शिरसाट यांचा जन्म झाला. टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांनी जैववैद्यकीय प्रयोगशाळा सुरू केली. त्यांची लॅब जगप्रसिद्ध झाली. भारतीय विद्या भवनच्या आयुर्वेदिक केंद्रात त्यांनी १७ वर्षे काम केले. संशोधनात शिस्त पाळा. तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे निरीक्षण आले तरी त्याच्या नोंदी ठेवा, असे तरुण शास्त्रज्ञांना त्यांचे सांगणे होते.कुसुम मराठे : मुंबईत १९२४ रोजी कुसुम मराठे यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या (रॉयल) इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये बॉटनी आणि केमिस्ट्री हे विषय घेऊन बी.एस्सी होण्यासाठी दाखल झाल्या. त्यातही त्या विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या होत्या. बॉटनीमध्येच संशोधन करून एम.एस्सी होण्याचे त्यांनी ठरविले. शेवाळावर अधिक संशोधन झाल्यास त्यापासून अन्नही मिळवता येईल, असा त्यांचा विश्वास होता.