Join us

बीडीडी चाळ पुनर्विकास : नवी इमारत, नवे घर, टेरेस गार्डनवर करा सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना प्रत्येक इमारतीत तळ मजला, पार्किंगसाठी ६ पोडियम्स, १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना प्रत्येक इमारतीत तळ मजला, पार्किंगसाठी ६ पोडियम्स, १ एन्व्हायर्नमेंटल लेव्हल आणि त्यावर ३४ मजले व वर टेरेस गार्डन अशी रचना आहे. टेरेस गार्डन विकसित केल्याने सामाजिक उपक्रमांचे आयोजन शक्य होणार आहे.

शिवाय टेरेसवर सौरऊर्जा वॉटर हिटर तसेच फोटोव्होल्टिक सेल प्रस्तावित आहेत. प्रत्येक इमारतीच्या प्रवेशस्थानी एका सुसज्ज दुमजली एन्ट्रन्स लॉबी असेल. एन्व्हायर्नमेंटल लेव्हलचा प्रवेश अशाच एका सुसज्ज एन्ट्रन्स लॉबीतून होईल. सदनिका अशा डिझाइन केल्या गेल्या आहेत की, प्रत्येक सदनिकेच्या खिडकीतून दुसऱ्या सदनिकेच्या खिडकीत डोकावले जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक घरातील सदस्यांच्या प्रायव्हसीचे पालन होणार आहे.

बीडीडीची वास्तू उभारताना भौगोलिक रचनेस महत्त्व दिले गेले आहे. बीडीडी चाळींच्या प्रकल्पाचा लेआउटच क्लस्टर्सच्या रूपात असा तयार केला आहे की, वाऱ्याला कोठेही मोठ्या इमारतीचा अडसर आडवा येणार नाही. इमारतींचे डिझाइनही असे बनविले आहे की, दर दोन इमारतींच्या मधून वारे सहज वाहू शकतील.

त्याशिवाय प्रत्येक इमारतीच्या कोअर (लिफ्ट लॉबी, लिफ्ट व जिन्यांचा मध्यवर्ती भाग) मधून खेळती हवा व नैसर्गिक प्रकाश मिळेल अशी रचना बनविलेली आहे. हॉल, किचन व बेडरूम्स अशा रितीने जोडल्या गेल्या आहेत की, पॅसेजमध्ये अगदी एकही स्क्वेअर इंचाची जागा वाया जाणार नाही. त्यामुळे एक सुटसुटीत दोन बेडरूमचे अपार्टमेंट तयार होते. रहिवाशांना आता वा भविष्यात त्यांचे घर वातानुकूलित बनवायचे असल्यास, त्यांच्या सदनिकेबाहेर त्याचे मशीन बसविण्यास जागेचे प्रयोजन केले आहे.

प्रत्येक सदनिकेत वॉटर स्प्रिंकलर असे बसविले जातील की त्यांचे पाइप्स कोठेही दिसून येणार नाहीत. प्रत्येक सदनिकेत खिडक्या, टाइल्स, प्लम्बिंग फिक्स्चर्स व सॅनिटरी वेअर्स दिलेले असतील. प्रत्येक टॉयलेटमध्ये शॉवर एरिया वेगळा असल्याने सुट्या व ओल्या भागाचे योग्य व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे पाणी उडून टॉयलेट - कमोडची सीट व बेसिन एरिया ओला होणार नाही.

गेटेड कम्युनिटी या सामुदायिक रहिवासाच्या तत्त्वास अनुसरून प्रत्येक सेक्टरमध्ये रस्त्यास लागून एका व्यावसायिक इमारतीचे नियोजन अशा तऱ्हेने केले आहे की, व्यावसायिक व रहिवासी वर्दळ विभागली आहे. त्याशिवाय प्रत्येक सेक्टरसाठी स्वतंत्र बालवाडी, समाजकल्याण केंद्र, जिम, पुस्तकालय, मंदिरे यांची सोय असेल. संपूर्ण लेआउटकरिता पोस्ट ऑफिस, रोपवाटिका व बीडीडी चाळींच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा नमुना म्हणून एक हेरिटेज म्युझियमदेखील प्रस्तावित आहे.

------------------------------

बीडीडी चाळीत राहणारा एक सर्वसामान्य माणूस आता टॉवरमध्ये राहण्यास जाईल, वास्तू म्हणून त्याला त्याचे घर १०० टक्के आवडावे म्हणून केवळ ५०० चौरस फुटांची सदनिका मिळावी, हेच मुख्य उद्दिष्ट नाही तर जमीनस्तर, एन्व्हायर्नमेंटल लेव्हल व टेरेस लेव्हल अशा तीन वेगवेगळ्या स्तरांवर विभागला हरित विभाग, एन्व्हायर्नमेंटल लेव्हलवरील बागेत मुलांना खेळण्याच्या जागा, क्लब हाउस, जिम अशा मनोरंजनात्मक सुविधा असतील. प्रकल्पामध्ये मुक्त जागा ६५ टक्के व बांधकाम जागा ३५ टक्के अशी आहे. प्रकल्पाच्या मुख्य आराखड्यात हिरवे मोकळे विभाग जागोजागी दृष्टिक्षेपात येतील. प्रकल्पात छोट्या-छोट्या बगिच्यांची निर्मिती केली जाईल.

- विवेक भोळे, मुख्य वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, बीडीडी पुनर्विकास प्रकल्प, वरळी

------------------------------