Join us  

वांद्रे-कुर्ला संकुल-जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळल्याची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळल्याची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी संयुक्तपणे चौकशी करतील, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर याना जोडणारा बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा गर्डर कलंडला. त्यात १४ कामगार जखमी झाले. एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट दिली. ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल, असे शिंदे म्हणाले.

जखमी कामगाराची घेतली भेट

या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या १३ कामगारांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. तर एक कामगार अजूनही ॲडमिट आहे. शिंदे यांनी रुग्णालयात या कामगाराची विचारपूस केली. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.