Join us  

महापरिनिर्वाण दिनी अनधिकृत वाहनांना अन्नवाटपाला बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 1:24 AM

पासेस घेण्याचे पोलिसांचे आवाहन; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी निर्णय

मुंबई : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्कमध्ये चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना विविध वाहनांतून अन्नाची पाकिटे वाटप करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. चेंगराचेंगरी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे अनधिकृत गाड्यांना मज्जाव करण्यात येणार आहे. पोलिसांकडून त्याबाबत रीतसर पासेस घेणाºया संस्था, संघटनांनाच त्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबरला दादर शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येने भीमसैनिक देशभरातून अभिवादनासाठी येत असतात.विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून त्यांना अन्न व पिण्याच्या पाण्याची पाकिटे दिली जातात. शिवाजी पार्कात कोठेही वाहने उभी करून हे मदत कार्य केले जाते. ते घेण्यासाठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे़ त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या वर्षी ६ डिसेंबरला अन्नाची, पिण्याच्या पाण्याची पाकिटे वाटप करणाºया वाहनांवर निर्बंध घातले आहेत.या वेळी सर्व प्रकारची अन्नवाटप व्यवस्था ही शिवाजी पार्कवर रोड क्रमांक-५ येथेच केली जाणार आहे. त्या मार्गावर वाहन लावण्यासाठी पास घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना त्या ठिकाणी गाडी लावता येणार नाही. संबंधितांनी शिवाजी पार्क पोलिसांकडून आवश्यक पासेस घ्यावेत, अशी सूचना करण्यात आलेली आहे.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर