Join us  

राष्ट्रीय उद्यानात बांबूचा बगिचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:23 AM

बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बांबू उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

- सागर नेवरेकर मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बांबू उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. वनविभागाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. देशात २६० बांबूच्या प्रजाती आढळून येतात. त्यातील नॅशनल पार्कात ९४ प्रजातींची लागवड केली आहे. बांबू लागवड कशी करावी आणि बांबूसंबंधी सर्व माहिती देण्यासाठी वनविभागाने आसाम राज्यातून बांबूचे अभ्यासक डॉ. रहमत अली लसकर यांना बोलावून घेतले आहे.नॅशनल पार्कात काटेरी बांबू ही प्रजाती अस्तित्वात आहे. पारंपरिक आणि स्थापत्य कामासाठी बांबू हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आधुनिक काळात सुशोभीकरणासाठी बांबूचा वापर केला जातो. मातीचे प्रमाण कमी असले, तरी बांबू तग धरून असतो, तसेच बांबूमुळे मातीची धूप कमी होते. त्यामुळे आजच्या नवीन पिढीला बांबूचे उपयोग समजावून सांगण्यासाठी उद्यानात बांबू सेटम (उद्यान) उभारण्याचा प्रयत्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने केला आहे.नॉर्थ-ईस्ट बायो डायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर (आसाम) चे संस्थापक डॉ. रहमत अली लसकर यांनी याबाबत सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन वेळा आलो आहे. या बांबू उद्यानातून पुढच्या पिढीला चांगली माहिती प्राप्त होईल. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण मोठे आहे, परंतु पुढच्या पिढीतील शेतकºयांना बांबूपासून कलाकृती निर्माण करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो.देशात बांबूपासून बनविण्यात येणाºया हस्तकलाकृतींची उलाढाल ५५ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे देशवासीयांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे. जगभरामध्ये सर्वात जास्त बांबूच्या प्रजाती चीनमध्ये आढळून येतात, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. जगात बांबूच्या बाराशेप्रजाती आढळतात.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या संख्येने तरुणाई येत असते. त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन दिले गेले, तर यातून त्यांना रोजगारमिळेल.>बांबूच्या प्रजाती

आसाम राज्यात बांबूच्या ३०, अरुणाचल प्रदेश ७४, सिक्किम १५, मेघालय १०, मणिपूर ३५ आणि छत्तीसगडमध्ये ७ ते ८ प्रजाती आढळून येतात. अशा प्रत्येक राज्यातून निवडक बांबूच्या प्रजाती नॅशनल पार्कात आणून त्यांची लागवड केली आहे.