''बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 01:09 PM2019-11-21T13:09:02+5:302019-11-21T13:10:09+5:30

राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे.

"Baba has decided once and for all, Chief Minister will be of Shiv Sena" | ''बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार''

''बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार''

Next

मुंबईः राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही बैठकांवर बैठका होत असून, त्यांना काही मुद्द्यांवर शिवसेनेकडून स्पष्टता हवी असल्याची माहिती समोर आली आहे. या आघाडीचे शिल्पकार हे संजय राऊत असल्याचंही बोललं जातंय. निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसापासून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा धडाका लावला होता. दरदिवशी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपावर निशाणा साधत होते, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर स्तुतिसुमनं उधळत होते. त्यावेळीच महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती.

गेल्या काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर अॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असून, राऊत आता पुन्हा राजकीय भूमिका मांडत आहेत. संजय राऊतांचं कुटुंबसुद्धा त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी दिल्लीत दाखल झालं असून, राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांच्या पुत्रीनं मतप्रदर्शन केलं आहे. बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं मत विधिता राऊत यांनी व्यक्त केलं आहे.  पुढे ती म्हणते,  “बाबा जे जे काही बोलतात ते नेहमीच करून दाखवतात. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे त्यांनी सांगितलंय, म्हणजे तसंच होणार असल्याचं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत विधितानं म्हटलं आहे. 

दुसरीकडे, काल झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मात्र रात्रभरातच चर्चेद्वारे सर्व मुद्दे निकालात काढून येत्या दोन दिवसांत शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे कळते. मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल.

शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना शुक्रवारी पॅन, आधार कार्ड, आदी पुराव्यासह मुंबईत बोलावले आहे. त्यांना तीन-चार दिवस राहण्याच्या तयारीने येण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते. 

Web Title: "Baba has decided once and for all, Chief Minister will be of Shiv Sena"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.