Ayodhya Verdict - मुंबईत जमावबंदीसह चोख पोलीस बंदोबस्त, सोशल मीडियावर बारकाईने लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 04:30 AM2019-11-10T04:30:15+5:302019-11-10T04:31:26+5:30

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन खटल्याचा निकाल शनिवारी लागला

Ayodhya Verdict - Mumbai Accurate police watch, watch over social media | Ayodhya Verdict - मुंबईत जमावबंदीसह चोख पोलीस बंदोबस्त, सोशल मीडियावर बारकाईने लक्ष

Ayodhya Verdict - मुंबईत जमावबंदीसह चोख पोलीस बंदोबस्त, सोशल मीडियावर बारकाईने लक्ष

Next

मुंबई : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन खटल्याचा निकाल शनिवारी लागला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सोमवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात ठेवण्यात आलेला बंदोबस्त कायम राहणार आहे.
शहरातील धार्मिक स्थळांसह धार्मिक तेढ निर्माण होईल अशा संवेदनशील ठिकाणांसह सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे, बाजार अशा ठिकाणांवरही पोलिसांचा कडक पहारा तैनात आहे. शिवाय, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावरील हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयित व्यक्ती, वस्तू, वाहने आणि सामानाची तपासणी सुरू केली आहे. तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) अन्य तपास यंत्रणांनीही देशाच्या या आर्थिक राजधातील हालचालींवर नजर ठेवली आहे.
खटल्याच्या निकालानंतर जल्लोष किंवा शोक व्यक्त करण्यासाठीच्या कार्यक्रमांना परवानग्या देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्ययात आले आहे. नागरिकांनीही न्यायालयाचे आदेश मान्य करून, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
निकालावर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इतर सोशल मीडियावर देऊ नये, पत्रकबाजी, टीकाटिप्पणी करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल. अशा व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जमाव करून थांबू नये, महाआरती, समूह पठण याचे आयोजन करू नये, मिरवणुका, रॅली काढू नये, कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये, अशा निकालापूर्वी दिलेल्या सूचनांचा पुनरुच्चार पोलिसांकडून करण्यात आला आहे.
>बंधुभाव कायम राखावा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनादर होईल असे कोणतेही कृत्य करू नये व रस्त्यावर उतरून निषेध, आंदोलन करणे टाळावे. शांतता ठेवावी. बंधुभाव कायम राखावा. आपल्या विरोधात निकाल असला तरी संयम पाळावा व सामाजिक सौहार्द कायम ठेवावे. समाजात तेढ निर्माण होईल व मने दुखावली जातील असे वर्तन करू नये व एक चांगला आदर्श निर्माण करावा, असे रझा अकादमीचे सरचिटणीस मौलाना सईद नुरी यांनी मुस्लीम बांधवांना आवाहन केले आहे.
मुंबई अमन कमिटीचे आवाहन
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीच्या दिवशी आला आहे. रविवारी ईद मिलादनिमित्त मुस्लीम समाज मोठ्या संख्येने मिरवणुकीसाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांवरील व धार्मिक नेते व सामाजिक कार्यकर्ता यांच्यावरील जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे. सर्वांनी शांतता राखवी. बंधुभाव जपावा. सर्वांच्या सहयोगाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेण्यात येईल, असे मुंबई अमन कमिटीचे अध्यक्ष फरीद शेख यांनी सांगितले.
>रेल्वे स्थानकांना छावणीचे स्वरूप
अयोध्या जमिनीप्रकरणी निर्णय जाहीर होताच गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला. त्यामुळे रेल्वे स्थानकांना छावणीचे स्वरूप आले होते.
निकालानंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर १०० हून अधिक सुरक्षा जवान तर कमी गर्दीच्या स्थानकांवर ५० सुरक्षा जवान तैनात होते. शनिवारी सकाळपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक स्थानकांवर गस्त घालत होते, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी दिली.
गर्दीच्या स्थानकांवर शनिवारी ‘आॅपरेशन बॉक्स’, ‘आॅपरेशन क्यू’ सुरू होते. याद्वारे स्टॉल, रेल्वे डबे, कचराकुंड्या यांची तपासणी करण्यात आली.
>सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे पालन करणे बंधनकारक आहे. या निकालामुळे राम मंदिराच्या नावावर केल्या जाणाºया राजकारणाला चाप बसेल
अशी शक्यता आहे. या निकालामुळे दोन धर्मातील
वैर भावना संपुष्टात येण्यास मदत होईल. दोन समाजातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वांनी या निर्णयाचा आदर करायला हवा.
- मजीद मेमन, खासदार, राज्यसभा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे. जो निकाल येईल तो मान्य करावा, ही राष्ट्रवादीची भूमिका होती. यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांच्या माध्यमातून धर्माच्या नावाने असा
वाद पुन्हा होणार नाही, अशी आशा आहे. निकालानंतर शांतता राखायची, असा निर्धारच लोकांनी केला होता. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कुठेही उत्सव साजरा करू नये. कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत ही भावना स्वीकारली पाहिजे.
- नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता
हिंदूंना रामजन्मभूमीची जागा मिळाली, मुस्लीम समुदायाला पर्यायी भूखंड मिळणार आहे, अशा प्रकारे दोन्ही बाजूंचे समाधान करणारा संतुलित निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या
आजच्या या निकालामुळे आता या विषयावर कायमचा पडदा पडला.
- सचिन अहिर, शिवसेना, माजी मंत्री
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एक ऐतिहासिक सत्य जगापुढे आले. या निर्णयामुळे सर्वच बांधवांना योग्य न्याय मिळाला आहे. आता लवकरच भव्य श्रीराम मंदिर या ठिकाणी उभे राहील.
- अनुप केणी, प्रदेश अध्यक्ष,हिंदूमहासभा
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सर्वांचे समाधान झाले आहे. कोणावर अन्याय झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. अगोदरच हा निर्णय झाला पाहिजे होता. पण ठीक आहे. जे काही झाले आहे; ते चांगले झाले आहे. निकालानंतर वातावरण शांत असल्याचे चित्र होते; ही समाधानकारक बाब आहे.
- रमेश प्रभू, गृहनिर्माण तज्ज्ञ
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा संतुलन साधणारा निर्णय आहे. कायदेशीर मुद्द्यांऐवजी सामाजिक मुद्द्यांवर जास्त लक्ष देऊन हा निर्णय देण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने नवीन मुद्द्यांवर निकाल दिला आहे. पुराव्यांवर जास्त भर देण्याऐवजी सामाजिक संतुलन साधण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे देशातील प्रलंबित विवाद संपुष्टात येऊन नवीन दिशेने जाणे शक्य होईल.
- सुरेंद्र बाजपेयी, कायदे सल्लागार

Web Title: Ayodhya Verdict - Mumbai Accurate police watch, watch over social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.