Join us  

मुंबईच्या आरे कॉलनीतील स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाला आली अवकळा

By मनोहर कुंभेजकर | Published: February 27, 2024 4:33 PM

उद्यान बनले प्रेमीयुगुल, मद्यपी गरदुर्ले यांचा अड्डा

मुंबई -गोरेगाव (पूर्व ) आरे कॉलनीतील स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. सद्यस्थितीत हे उद्यान प्रेमी युगुल आणि मद्यपींचा अड्डा बनला आहे. दिवसरात्र अनेक तळीराम येथ तळ ठोकून असतात. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याबाबत कारवाई करावी तसेच उद्यानाचे सुशोभिकरण करून त्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गोरेगाव (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक 52 च्या भाजपाच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी पत्राद्वारे केली आहे.

उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण हे म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्यावतीने सन २०२०-२१च्या क वर्ग पर्यटन निधीतून करण्यात आले होते.  उद्यानाच्या सुशोभिकरण आणि  नुतनीकरणाचे लोकार्पण तत्कालिन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. लोकार्पणानंतर स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी आपल्यासह आपल्या नेत्यांचे फोटो प्रदर्शित करत सावरकर उद्यानाचे नामफलक प्रत्येक प्रवेशद्वारांवर लावले आहेत. पण सदर उद्यानाचे लोकार्पण झाल्यानंतर उद्यानाच्या देखभालीकडे वायकर यांनी लक्षच दिले नाही. परिणामी आज दोन ते अडीच वर्षांपूर्वी बनवलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे असा आरोप प्रिती सातम यांनी आपल्या पत्रात केला आहे.

स्वा. सावरकर यांच्या प्रति देशवासियांना तीव्र आदर आहे. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते म्हणून सावरकर यांची ओळख असून कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकर यांचे नाव असणाऱ्या या उद्यानाची दुरवस्था झालेली पाहून अतिव दु:ख होत आहे. स्वा.सावरकरांच्या नावे असलेल्या या उद्यानाला आलेला हा बकालपणा कुणाही राष्ट्रप्रेमी जनतेला आवडणार नाही.सदर उद्यानाची दुरवस्था होत असतानाच वायकरांना या उद्यानाची देखभाल राखण्याचा प्रयत्न किमान सावरकर यांच्या नावासाठीही करावासा  वाटत नाही. यातच त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट होत आहे असेही माजी नगरसेविका प्रिती  सातम यांनी म्हटले आहे.

या उद्यानातील प्रत्येक झाड हे पाण्याअभावी सुकून गेले आहे, गवताचा भाग  सुकून, करपून गेला आहे. पायवाटांमध्ये कचरा पसरल्याने लोकांना चालताही येत नाही. कचरा दररोज साफ स्वच्छ केला जात नसल्याने एकप्रकारे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सावरकर यांच्या नावाने सुरु असलेल्या उद्यानाची जागा आता खंडर बनले असून त्याचा फायदा आता नशेबाज लोक आणि प्रेमी युगलांकडून घेतला जात आहे. या उद्यानांमध्ये दिवसा आणि रात्री दारु पिणारे आणि गर्दुल्ल्यांचा वावर असतो. दारु पिऊन याच ठिकाणी बॉटल्स टाकल्या जातात, बऱ्याचदा दारु पिऊन बाटल्या तिथेच फोडून टाकल्या जातात. याचा काचा जिथे तिथे पडलेल्या दिसून येत आहेत. गर्दुल्ले उद्यानातील कोपऱ्यात बसून असल्याने तसेच त्यांचा वावर असल्याने या उद्यानांमध्ये आता सर्वसामान्य जनता सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यास किंवा बसण्यास जाण्याचीही हिंमत दाखवत नाहीत. संध्याकाळच्यावेळी प्रेमी युगलांचाही वावर वाढतच चालला आहे. त्यांच्या विकृत चाळ्यांमुळे या उद्यानातील खेळण्याची साहित्य असूनही पालक मुलांना याठिकाणी घेऊन येण्यास तयार होत नाही. या उद्यानाच्या शेजारी दुध सागर आणि महानंदा या निवासी वसाहती असून या सर्वांसाठी हे उद्यान डोकेदुखी ठरु लागले आहे.  उद्यानातील नशेबाज लोक आणि विकृत चाळे करणारे प्रेमी युगल यामुळे या दोन्ही वसाहतींमधील लोकांना या मार्गावरुन ये -जा करण्यास भीती वाटत आहे, त्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  सावरकर यांचे नाव या उद्यानाला आहे, पण त्यात अशाप्रकारे धंदे चालत असल्याने एकप्रकारे तमाम हिंदुंच्या भावना भडकल्या जात आहेत.

 त्यामुळे स्थानिक आमदारांनी आपले फलक लावून या उद्यानाची दुरवस्था करून तमाम सावरकर प्रेमींच्या अवमान केला आहे. सदर उद्यान हे  प्रेमी युगल आणि नशेबाजांसाठी एक अड्डा निर्माण करून दिला का असा सवाल आता स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे सावरकरांच्या नावाने  खुले केलेले हे उद्यान या भागातील जनतेला सुसज्ज असे निर्माण करून देण्यासाठी याचे सुशोभिकरण करून त्यांची योग्यप्रकारे देखभाल राखण्यासाठी  निधी उपलब्ध करून  देत प्रयत्न केले जावे. या उद्यानाचे सुशोभिकरण करून त्यांची देखभाल राखल्यास खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रध्दांजली ठरेल असेही प्रिती  सातम यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईगोरेगाव