अविनाश भोसले यांनी मुंबईत खरेदी केले १०३ कोटींचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:45+5:302021-06-16T04:08:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर काहीसा परिणाम झाला असला तरी, मुंबईत मागील काही दिवसापासून जास्त किमतीच्या ...

Avinash Bhosale bought a house worth Rs 103 crore in Mumbai | अविनाश भोसले यांनी मुंबईत खरेदी केले १०३ कोटींचे घर

अविनाश भोसले यांनी मुंबईत खरेदी केले १०३ कोटींचे घर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर काहीसा परिणाम झाला असला तरी, मुंबईत मागील काही दिवसापासून जास्त किमतीच्या घरांची खरेदी वाढली आहे. विकासक आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात तब्बल १०३.८० कोटींचे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे.

मलबार हिल येथील सेसन या इमारतीत ५३ आणि ५४ व्या मजल्यावर भोसले यांनी हे घर खरेदी केले. ३१ मार्च २०२१ रोजी या घर खरेदीची नोंदणी करण्यात आली होती. या डुप्लेक्स घराचे एकूण क्षेत्रफळ ७,११८ चौरस फूट असून, टेरेसचे क्षेत्रफळ ३,५०३ चौरस फूट आहे. यासोबतच त्यांना पाच गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा मिळाली आहे.

बांधकाम क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सरकारने २०२१ च्या जानेवारी ते मार्चदरम्यान मुद्रांक शुल्कात तीन ते पाच टक्‍क्‍यांनी सवलत दिली होती. ३१ मार्च ही या मुद्रांक शुल्क सवलतीची शेवटची तारीख होती. या डुप्लेक्स घराचा ३१ मार्च रोजी सौदा झाल्याने भोसले यांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळाली. त्यामुळे त्यांनी ३.४० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले.

मागील काही दिवसापासून मुंबईत महागडी घरे खरेदी केली जात आहेत. काही दिवसापूर्वी डी-मार्टचे राधाकृष्णन दामानी यांनी मलबार हिल परिसरात १००१ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. तर वरळी येथे रहेजा कुटुंबीयांनी ४२७ कोटी रुपयांचे थ्री डुप्लेक्स घर खरेदी केले होते. त्याच इमारतीत स्मिता पारेख यांनी ५० कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. नुकतेच बीग बी अमिताभ बच्चन यांनीही अंधेरी येथे ३१ कोटी रुपयांचे डुप्लेक्स घर खरेदी केले. तर भोसले यांनी ज्या इमारतीत घर खरेदी केले त्याच इमारतीत काही दिवसापूर्वी ५१ आणि ५२ व्या मजल्यावर १०३.६५ कोटी रुपयांचे घर खरेदी करण्यात आले होते.

.......................................

Web Title: Avinash Bhosale bought a house worth Rs 103 crore in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.