सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 05:30 PM2020-07-15T17:30:02+5:302020-07-15T17:31:06+5:30

महावितरणला एक हजार कोटींचा फटका ?, अदानीने सोडले १०० कोटींच्या महसूलावर पाणी, टाटा, बेस्ट मात्र विलंब शुल्काच्या व्याजावर ठाम

The average bills also shock the power companies | सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक

सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक

Next

 

मुंबई :  कोरोना संकटामुळे धाडलेल्या सरासरी बिलांनी वीज ग्राहकांना घाम फोडला असतानाच वीज वितरण कंपन्यांनाही त्याचा शाँक बसण्याची चिन्हे आहेत. एकरकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलत आणि विलंब शुल्कावरील व्याज माफीमुळे महावितरणाला सुमारे एक हजार कोटींचे नुकसान सोसावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत वीज पुरवठा करणा-या अदानी इलेक्ट्रीसीटीने विलंब शुल्कावरील व्याजमाफी दिल्यामुळे त्यांना सुमारे १०० कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. तर, बेस्टने आपले सुमारे ४० कोटी आणि टाटा पावरने ३५ कोटी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी विलंब शुल्कावरील व्याज वसूली सुरूच ठेवली आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांत मीटरचे रिडिंग शक्य नसल्याने सरासरी वीज बिले धाडण्यात आली होती. त्यामुळे जेवढा वीज वापर झाला होता त्यापेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के कमी रकमेची बिले ग्राहकांना दिली गेली. जून महिन्यांत मीटर रिडींग घेऊन बिल वाटप झाले. त्यामुळे अनेक ग्राहकांची बिले दोन ते अडीच पटीने वाढली आहेत. देय तारखेनंतर त्या बिलांचा भरणा केल्यास एमईआरसीच्या नियमानुसार विलंब शुल्क आणि त्यावरील व्याज भरणा क्रमप्राप्त आहे. मात्र, या वाढीव बिलांमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी हे व्याज माफ करून तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे. त्याशिवाय एकरकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलतही देण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणच्या तोट्यात भर पडणार असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. जून महिन्यांच्या वीज बिलांची भरणा करण्याची मुदत येत्या सात दिवसांत संपेल. त्यानंतर दोन टक्के सवलत किती जणांनी घेतली आणि किती ग्राहकांनी हप्त्याने बिल भरण्याचा पर्याय स्वीकारला हे स्पष्ट होईल. त्याआधारे महावितरणला किती कोटींची भुर्दंड सोसावा लागेल याचा ताळेबंद मांडता येईल असेही या आधिका-याने स्पष्ट केले.      

.............................

टाटा बेस्टच्या ग्राहकांना ७५ कोटींचा फटका ?

टाटा आणि बेस्ट या मुंबईकरांना वीज पुरवठा करणा-या दोन कंपन्यांनी विलंब शुल्क आणि त्यावरील व्याज माफ केलेले नाही. तसेच, एक रकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलतही नाही. त्यामुळे त्या ग्राहकांना सर्वाधिक नुकसान सोसावे लागणार आहे. सर्व ग्राहकांनी जर तीन हप्त्यांत पैसे भरले तर विलंब शुल्क आणि व्याजापोटी टाटाच्या ग्राहकांकडून सुमारे ३० ते ३५ कोटी आणि बेस्टच्या ग्राहकांकडून ४० ते ४५ कोटींची अतिरिक्त वसूली होईल असे वीज अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांनी विलंब शुल्क आणि व्याज माफ केले तर वीज कंपन्यांना तेवढा तोटा सोसावा लागणार आहे.   

दोन टक्के सवलतीपेक्षा हप्तांना प्राधान्य ?

वीज बिल एकरकमी भरले तर दोन टक्के सवलत देण्याचे महावितरणने जाहीर केले आहे. मात्र, १० हजार रुपयांचे बिल असले तरी दोन टक्क्यानुसार त्यावर फक्त २०० रुपयांचीच सवलत मिळेल. त्यापेक्षा हे बिल बिनव्याजी तीन हप्त्यात भरणे जास्त सोईस्कर ठरू शकते. त्यामुळे वीज ग्राहक सवलतीपेक्षा हप्त्यांमध्ये बिलांचा भरणा करण्यास प्राधान्य देतील असे महावितरणच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. 

Web Title: The average bills also shock the power companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.