Join us  

पश्चिम रेल्वे स्थानकावर स्वयंचलित पर्जन्यमापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 4:44 AM

पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पावसाच्या नोंदी घेण्यासाठी चर्चगेट ते विरार या मार्गात आणखी आठ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक बसविले जातील.त्यामुळे चर्चगेट ते विरारदरम्यान एकूण १६ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक असतील.

पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या प्रयत्नांनी पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भाईंदर स्थानकावर उभारण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात भाईंदरसह महालक्ष्मी, वांद्रे, राम मंदिर, दहिसर, मीरा रोड या सहा ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात दादर आणि अंधेरी स्थानकात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. तर आता विरार, नालासोपारा, वसई रोड, बोरीवली, गोरेगाव, सांताक्रुझ, वांद्रे टर्मिनस, गॅ्रण्ट रोड या ठिकाणी यंत्रे बसविली जातील. त्यामुळे किती वेळेत किती पाऊस पडला याची नोंद घेऊन रेल्वे वाहतुकीचे नियोजन शक्य होईल.

हे यंत्र मानवविरहीत असून सौरऊर्जेवर चालविण्यात येते. विद्युत पुरवठा आवश्यकतेनुसार केला जाणार आहे. बॅटरी बॅकअ‍ॅपची यंत्रणा सुरू करण्यात येईल. यंत्र बसविण्यासाठी ५ लाख ७५ हजार रुपये खर्च केला आहे. पश्चिम रेल्वे भरती-ओहोटीच्या नोंदी ठेवणार आहे. तसेच पर्जन्यमापक यंत्रामुळे पाऊस किती पडला याच्या नोंदी ठेवणे शक्य होईल. पावसात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाणी साचण्याच्या ठिकाणी अधिक पंपांची व्यवस्था केली जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.