Join us  

लेखक मरेपर्यंत नाट्यलेखन करू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 3:04 AM

नाटककाराला नाटकासाठी पूर्ण वेळ देण्याची आवश्यकता नसते आणि त्याला वयाची मर्यादाही नसते.

मुंबई : नाटककाराला नाटकासाठी पूर्ण वेळ देण्याची आवश्यकता नसते आणि त्याला वयाची मर्यादाही नसते. लेखक मरेपर्यंत नाट्यलेखन करू शकतो, असा सूर ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांनी ‘नव्या नाटककारांकडून रंगभूमीच्या अपेक्षा’ या विषयावरील रंगसंवादात लावला आणि या चर्चेचा परीघ केवळ परिसंवादापुरता मर्यादित न राहता; यातून थेट ‘पुरु’ संवाद रंगला.

मराठी नाटक समूह आणि अभिषेक थिएटर्स यांच्या वतीने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात नाट्यलेखन स्पर्धेच्या निमित्ताने या ‘रंगसंवाद’चे आयोजन करण्यात आले होते. यात ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक व निर्माते पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ नाटककार अनिल बांदिवडेकर, ज्येष्ठ नाट्यनिर्माते अनंत पणशीकर, रंगकर्मी क्षितिज झारापकर सहभागी झाले होते. यातून एकूणच नाट्यलेखनाविषयीचे कंगोरे अधिक टोकदार झाले.

प्रचलित कोंडी फोडणारा विषय नाटकासाठी घेतला आहे का आणि त्या कोंडीतून मार्ग काढण्याची क्षमता आपल्यात आहे का, हे लेखकांनी तपासून पाहायला हवे. ‘मी थांबणार नाही’ अशी वृत्ती लेखकांनी अंगी बाळगायला हवी. नाटककाराला नाटकासाठी पूर्ण वेळ देण्याची आवश्यकता नसते. पण नाटकाच्या इतर अंगांना, म्हणजे दिग्दर्शक आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळणाऱ्यांना मात्र संपूर्ण वेळ नाटकाला वाहून घ्यावे लागते. लेखकाला वयाचा अडसर नसतो; तो मरेपर्यंत नाट्यलेखन करू शकतो, अशी भूमिका मांडत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या वेळी उपस्थित नवीन लेखकांशी थेट ‘पुरु’ संवाद रंगवला.

निर्मात्यांनी एखाद्या लेखकाचे नाटक का घ्यावे, असा प्रश्न लेखकाला पडला पाहिजे. मूळ संहिता उत्तम असेल, तर नवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन नाटक भक्कम उभे राहू शकते. प्रेक्षकांना कुठल्या विषयात रस आहे, याचा अंदाज लेखकाला असायला हवा. निर्मात्याने काही लाखांची रक्कम नाटकासाठी का लावावी याचा विचार करत, उत्तम तेच देण्याचा प्रयत्न नवीन लेखकांनी करायला हवा, असे मत अनंत पणशीकर यांनी निर्मात्यांच्या दृष्टिकोनातून व्यक्त केले.

लेखकाने प्रथम स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. नाटकाची गोष्ट तुम्ही कशी मांडता, हे अधिक महत्त्वाचे असते. एकेकाळी एका विशिष्ट वर्गाचे असलेले मराठी नाटक काळाच्या ओघात बहुजन वर्गाचे झाले आहे, याची जाणीव लेखकांनी ठेवली पाहिजे. लेखकाने दिसामाजी लिहीत राहात, कायम व्यक्त होत राहिले पाहिजे, अशी भूमिका अनिल बांदिवडेकर यांनी मांडली.

टॅग्स :साहित्य