Audience, circus without animals 'Sunisuni' | प्रेक्षक, प्राण्यांविना सर्कस झाली ‘सुनीसुनी’
प्रेक्षक, प्राण्यांविना सर्कस झाली ‘सुनीसुनी’

- सागर नेवरेकर 

मुंबई : सहसा न दिसणारे प्राणी, झोपाळ्याचे खेळ करणारे कलाकार, जादूगार, प्राण्यांच्या कसरती आणि हे पाहणारे, मनमुराद अनुभवणारे प्रेक्षक असे दृश्य सर्कसच्या तंबूत सहज दिसायचे. आता मात्र चित्र वेगळेच आहे. प्रेक्षक कमी, प्राणीही कमी झाल्याने सर्कसच्या कलाकारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे, ही प्रतिक्रिया आहे रेम्बो सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांची. गेली २८ वर्षे ते सर्कस चालवत आहेत; आणि आताची सर्कसची दुर्दशा पाहून खंत व्यक्त करीत आहेत.

भटकणाऱ्या सर्कसला जागेचा अभाव, विजेचा, खाण्यापिण्याचा, प्राण्यांचा आणि कलाकारांचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे भारतात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच सर्कस तग धरून आहेत. सरकारने या कलेच्या संवर्धनासाठी उभे राहावे, अशी अपेक्षा सर्कसवाले लोक व्यक्त करीत आहेत.

रॅम्बो सर्कसचे मालक सुजीत दिलीप म्हणाले, बदलत्या काळानुसार सर्कसमध्ये विविध बदल घडत आहेत. सर्कसमध्ये प्राण्यांवर बंदी आणल्यापासून सर्कस उद्योगाला उतरती कळा आली. परंतु आता सर्कसमध्ये लॅडर बॅलेंसिंग, आयकेरियन गेम, जर्मन व्हील, ग्लो आॅफ डेथ, फ्लायट्रेपिस, सीगल व्हिल सायकल, जंगलिंग, डॉग मॅथेमेटिक्स इत्यादी खेळ दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. ओरियंटल, एरिना आणि व्हिक्टोरिया या तीन सर्कस मिळून ‘रॅम्बो सर्कस’ तयार झाली.

सध्या देशभरात २० सर्कस सुरू आहेत. ‘रॉयल’ आणि ‘ग्रेट प्रभात’ या अलीकडेच बंद पडल्या. खरेतर, सर्कसमुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तसेच सर्कस चालविणे हे फक्त शहरांमध्येच शक्य आहे. कारण खेडेगावांत दुष्काळ पडल्यामुळे तेथील लोकांकडे पैसा नाही. त्यामुळे आता मुंबईतच खेळ करण्याचे ठरविले आहेत. फिनलँड, डेन्मार्क, चिली इत्यादी देशांतील सर्कसला युनेस्कोचा ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ (इंटॅजिबल कल्चरल हेरिटेज)चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील २० सर्कसलादेखील युनेस्कोचा दर्जा मिळावा, यासाठी रॅम्बो सर्कसकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सध्या प्रेक्षकांकडूनही सर्कसला कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असून कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे मोठे दुदैव आहे, असेही सुजीत दिलीप यांनी सांगितले.

भारतीय सर्कसचा जन्म कसा झाला?
मुंबईत बोरीबंदरसमोर चर्नी विल्सन या इंग्रज कलाकाराने ‘हर्मिस्टन सर्कस’ सुरू केली होती. भारतात आलेली ही कदाचित पहिलीच सर्कस होती. त्या वेळी, चर्नी विल्सन काहीशा आढ्यतेनेच म्हणाले होते की, घोड्यांच्या अशा कसरती हे आमचे वैशिष्ट्य आहे. कोणीही भारतीय हे करू शकणार नाही. हे ऐकताच विष्णुपंत छत्र्यांमधील अस्सल भारतीय जागा झाला, त्याला फुंकर घातली कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला. नोव्हेंबर १८८२ साली ‘गँ्रड इंडियन सर्कस’ ही विष्णुपंत छत्र्यांची सर्कस मुंबईच्या क्रॉस मैदानावर उभी राहिली. दसºयाच्या मुहूर्तावर इ. स. १८८२ मध्ये या सर्कसचा पहिला शो म्हणजे भारतीय सर्कसचा जन्म झाला.

परदेशातील सर्कसमध्ये अजूनही वन्यप्राणी
भारतीय लोक वाघ बघण्यासाठी सिंगापूर आणि थायलंड या देशांत जातात. परंतु आपल्या येथील काही निवडक प्राणिप्रेमींच्या चुकांमुळे सर्कसमधील प्राण्यांवर बंदी आली. सिंह, वाघ, हरीण, जिराफ, झेब्रा, गेंडा, हत्ती, चिम्पांजी असे विविध प्रकारचे प्राणी व पक्षी हे युरोपच्या सर्कसमध्ये काम करीत आहेत. मात्र काही देशांमध्ये सर्कसमधील प्राण्यांवर बंदी आणल्यापासून सर्कस बंद पडल्या.

Web Title: Audience, circus without animals 'Sunisuni'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.