असे महान नेते काँग्रेसला सावरणार की बुडवणार?- संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 09:40 PM2019-10-07T21:40:04+5:302019-10-07T21:40:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या संजय निरुपमांनी स्वकीयांवरच टीकास्त्र सोडलं आहे.

assembly election mumbai congress sanjay nirupam attacks mallikarjun kharge | असे महान नेते काँग्रेसला सावरणार की बुडवणार?- संजय निरुपम

असे महान नेते काँग्रेसला सावरणार की बुडवणार?- संजय निरुपम

Next

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या संजय निरुपमांनी स्वकीयांवरच टीकास्त्र सोडलं आहे. ट्विट करत संजय निरुपमांनी काँग्रेसच्या नेत्यांवरच आगपाखड केली आहे. ते म्हणाले, महान नेते खरगे यांनी रविवारी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती, ती बैठक फक्त 15 मिनिटांत संपवण्यात आली.

बैठकीत कोणालाही बोलू दिलं नाही. बैठकीत ते स्वतः बोलले आणि माझी मस्करी करून निघून गेले. संजय निरुपम पुढे म्हणाले, दुर्दैवानं असे महान नेते काँग्रेसला सावरणार की बुडवणार?, पक्षात जे काही चाललं आहे, त्यानं राहुल गांधीही असंतुष्ट आहेत. त्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनीही पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रिपोर्टनंतर कारवाई करण्यात येईल.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मिलिंद देवरा आणि संजय निरुपमांचंही नाव नाही. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही स्टार प्रचारकांच्या यादीतून कोणाचंही नाव कमी केलेलं नाही. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसारच स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे.

'मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मुंबईतलं फक्त एक तिकीट मागितलं होतं, पण तेही दिलं गेलेलं नाही. त्यामुळे मी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नाही', असा आक्रमक पवित्रा घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर शरसंधान केलं आहे. काँग्रेसने पुन्हा नव्या जोमाने झेप घ्यावी, ही माझी भावना आहे आणि त्यासाठी यापुढेही काम करण्याची इच्छा आहे. परंतु, मला ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती तशीच मिळत राहिली तर फार काळ थांबणं शक्य नाही, असं निरुपम यांनी स्पष्ट केलं. देशातील, राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. ती पक्षश्रेष्ठींना समजून घ्यावी लागेल. चापलुसी न करणाऱ्या नेत्यांना, बंद खोली राजकारण न करणाऱ्या नेत्यांना संधी द्यावी लागेल, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. जे सुरू आहे ते अजून तरी सहन करू शकतोय. ज्या दिवशी सहनशक्तीचा अंत होईल, तेव्हा पुढचा निर्णय घेईन, असंही त्यांनी सूचित केलं. 

  

 

Web Title: assembly election mumbai congress sanjay nirupam attacks mallikarjun kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.