Ashok Chavan demands village camps to resolve crop insurance complaints | पीक विम्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्या, अशोक चव्हाण यांची मागणी
पीक विम्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्या, अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई -  पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण म्हणतात की, ''पीक विमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई दिलेली नसल्याचे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुष्काळ व सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांना पीक विम्याच्या भरपाईच्या माध्यमातून भरीव मदतीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतानाही कर्जमाफी मिळालेलीच नसल्याची व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.''

''पीक विमा आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी २२ जुलै २०१९ पासून आंदोलनाला बसले होते. हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसानंतर या आंदोलकांची भेट घेऊन पीक विम्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा घेण्याचे तसेच आठ दिवसांत कर्जमाफी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी आणि पीक विम्याची समस्या केवळ एखाद्या गावापुरती मर्यादित नसून, ती राज्यव्यापी समस्या आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा गावाप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात पीक विमा तक्रार निवारण शिबिरे आयोजित करावीत. या माध्यमातून प्रशासन आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात आपल्या व्यथा मांडण्याची संधी मिळू शकेल,'' असे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


Web Title: Ashok Chavan demands village camps to resolve crop insurance complaints
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.