Join us  

अरुण गवळीच्या नावाने दीड कोटीच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:36 AM

दगडी चाळीतून अरुण गवळीचा माणूस बोलत असल्याचे सांगून मुलुंडच्या ७१ वर्षीय व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

मुंबई : दगडी चाळीतून अरुण गवळीचा माणूस बोलत असल्याचे सांगून मुलुंडच्या ७१ वर्षीय व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी रघू शिंदे नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केला आहे.मुलुंड योगी हिल परिसरात ७१ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा मुरबाडमध्ये एका नामांकित कंपनीसाठी लोखंडी ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट बनविण्याचा कारखाना आहे. त्यांची वार्षिक उलाढाल ३५ ते ४० कोटी आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मार्च रोजी कामकाज आटोपून ते घरी आले. त्याच दरम्यान रात्री दहाच्या सुमारास आलेल्या फोनने त्यांना धडकीच भरली. समोरच्या व्यक्तीने त्याचे नाव रघू शिंदे सांगून दगडी चाळीतून डॅडीचा माणूस बोलतोय असे सांगितले. भेटायचे असल्याचे सांगून फोन बंद केला. सुरुवातीला कोणी तरी मस्करी करत असावे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. २७ मार्चला पुन्हा रघू शिंदे नावाच्या व्यक्तीने फोन करून दीड कोटीच्या खंडणीची मागणी केली. गेल्या १० दिवसांपासून आमची माणसे मागावर असल्याचे सांगितले. पैसे न दिल्यास मुलांना मारण्याची धमकी दिली. त्यांनी ही बाब मुलाला सांगितली.मुलाने तत्काळ मुलुंड पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी रघू शिंदे नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केला आहे.