Join us  

क्षुधाशांती!

By admin | Published: May 28, 2017 12:08 AM

उन्हाळ्यात घशाला आणि पर्यायाने शरीराला थंडावा हवा असतो. क्षुधाशांतीसाठी सरबते, ज्यूस, मॉकटेल्स, स्मूदी अशा अनेक पेयांची सध्या चलती आहे. मात्र पारंपरिक पेये ही खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण आहेत.

- भक्ती सोमण उन्हाळ्यात घशाला आणि पर्यायाने शरीराला थंडावा हवा असतो. क्षुधाशांतीसाठी सरबते, ज्यूस, मॉकटेल्स, स्मूदी अशा अनेक पेयांची सध्या चलती आहे. मात्र पारंपरिक पेये ही खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण आहेत. गेल्या काही दिवसांतला उन्हाळा जरा कंटाळवाणाच आहे. ना धड ऊन, ना धड पाऊस असं वातावरण. असं असलं की शरीराची घामाने चिकचिक होते. घसा कोरडा होतो. अशावेळी सोडामिश्रित पेयं प्यावीशी वाटतात. ती प्यायलावर जरा वेळ का होईना, तहान भागते; पण, समाधान मिळतंच असं नाही. यावर उपाय काय? तर उपाय आहेतच. या काळात मिळणारी कैरी, कोकम, वाळा, बेलफळ, उसाचा रस, लिंबू सरबत, जलजीरा, विविध फळांची सरबते अशी पेये क्षुधाशांतीवर समाधान देणारी असतात. म्हणून तर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने या पेयांचे महत्त्व खूप मोठे आहे. या पेयांशी अनेकांच्या आठवणीही जोडलेल्या असतात.नागपूरला माझ्या मैत्रिणीच्या घरी बेलाचं झाड आहे. उन्हाळ्यात ताडोबाला जायच्या निमित्ताने तिच्या घरी गेल्यावर हे झाड दृष्टीस पडलं. झाडाला पिवळ्या रंगाची फळं लगडलेली होती. काही वेळाने जोरात आवाज आला म्हणून बघितलं तर अंगणात ५-६ बेलफळं पडलेली होती. इतकंच नाहीतर, एका टोपलीत किमान ३० तरी बेलफळं होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही फळं फक्त उन्हाळ्यात येतात हे कळलं. फळ फोडल्यावर ते लगेच वापरावे लागते. कारण ते खराब व्हायला लागते. हे ती सांगत असतानाच बेलफळाचे सरबतही प्यायले. फळाचा गर उकळवून केलेले ते सरबत आंबटगोड चवीचे होते. त्यामुळे त्या उन्हाचा दाह फार जाणवला नाही.बेलफळाबरोबरच उसाचा रसही ऊर्जा राखण्यात मदत करतो. सब्जाचं बी तर अतिशय गुणकारी. आपण फालुद्यात सब्जा घालतोच. पण या दिवसांत पाण्यात नुसता सब्जा घालून प्यायले तरी शांत वाटते. तर बडीशेपचे सरबत किंवा पाणी पिऊनही थंड वाटते. बडीशेप घालून पाणी उकळवतात आणि ते थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालायची आणि मग हे पाणी प्यायचे. किंवा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून काढून त्याचा रस आणि पिठीसाखर असे सरबतही होते. अशा अनेक पेयांविषयी आपण पुढे पाहणार आहोतच. निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. उन्हाळ्याचा दाह कितीही असला तरी या काळात मिळणाऱ्या फळांचा योग्य उपयोग करत आपण हा दाह नक्कीच कमी करू शकतो. म्हणूनच हा मे महिना या काळात या पेयांमुळे सुखकर वाटतो. नाही का! वाळ्याचे सरबतउन्हाळ्यात माठातल्या पाण्यात जर वाळा घातला तर सोने पे सुहागाच! त्या वाळ्याची गोडसर चव क्षुधा शमवते. आपले शरीर थंड राहते. उष्णतेच्या विकारांपासून रक्षण करणारा हा वाळा आता पूर्वीसारखा अगदी सहज मिळत नाही. मात्र आता वाळा म्हणजे खसचे सरबत तर अगदी सर्रास मिळते. हिरव्या रंगाच्या सरबतात सब्जाचं बी घातलं तर पौष्टीकपणा वाढतोच आणि चवही मस्त लागते.