Join us  

अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या आर्थिक व्यवहारात ३०० कोटींची अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:07 AM

आयकर विभागाचे छापे, दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू, मुंबईसह, दिल्ली, पुण्यात ३० ठिकाणी धाडीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील ...

आयकर विभागाचे छापे, दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू, मुंबईसह, दिल्ली, पुण्यात ३० ठिकाणी धाडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिगदर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, विकास बहल आदींच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्याची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या कंपनीची मिळकत आणि आर्थिक व्यवहारात ३०० कोटींवर अनियमितता आढळून आली. २०११ ते २०१८ या वर्षांतील करचुकवेगिरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अनुराग कश्यप व तापसीची पुण्यातील एका हॉटेलात अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले. आयकर विभागाने बुधवारी मुंबई- पुण्यासह दिल्ली, हैदराबाद आदी विविध ३० ठिकाणी छापे मारले. त्यामध्ये दोघांसह विकास बहल, क्वान टलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मधू मंटेना यांच्याही मालमत्तेचा समावेश आहे. त्यांनी २०१५ मध्ये फँटम हा चित्रपट बनविला होता. त्यांच्याशी संबंधित व्यवहारावरून त्यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती घेत आहेत.

जवळपास ३०० कोटींचा हिशोब त्यांनी आयकर विभागाकडे सादर केलेला नाही. त्याचबरोबर तापसीला व्यवहारात ५ कोटी रोकड मिळाली होती, असे सांगण्यात आले.

केंद्र सरकारविरोधातील भूमिकेमुळे कारवाई

अनुराग कश्यप, तापसी पन्नूने केंद्र सरकारच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात नेहमी उघडपणे भूमिका मांडली आहे. एनआरसी, सीएएविरोधी कायदा, शेतकऱ्याचे आंदोलनबाबत ट्वीट करून भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्याबाबत सोशल मीडियावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे.