Join us  

प्लास्टिकविरोधी कारवाई मंदावली

By admin | Published: January 14, 2015 2:55 AM

मुंबापुरीची तुंबापुरी होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईत केवळ दोनच वर्षांत सुमारे दहापटीहून अधिक घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चेतन ननावरे, मुंबईमुंबापुरीची तुंबापुरी होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईत केवळ दोनच वर्षांत सुमारे दहापटीहून अधिक घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कारवाई थंडावली असून पालिककडे संपूर्ण मुंबईत कारवाई करण्यासाठी केवळ दोनच पथके असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६ व महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग्ज) (उत्पादन व वापर) नियम, २००६ च्या नियम ८ नुसार, किमान जाडी ५० मायक्रॉनपेक्षा कमी व आकार ८’७१२’ पेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. मात्र मुंबईतील बहुतांश दुकानदार आणि फेरीवाले नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे अशा प्लास्टिक पिशव्यांचा संग्रह, वितरण व विक्री करताना दिसत आहेत. याउलट अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पालिका प्रशासन कारवाई करण्यात हतबल असल्याचे निदर्शनास आले आहे.हास्यास्पद बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २४ वॉर्डमध्ये कारवाई करण्यासाठी पालिकेकडे केवळ दोन पथके आहेत. दोन चारचाकी गाड्यांमधून ही पथके मुंबईतील दुकानदार आणि फेरीवाल्यांवर कारवाई करतात. मुंबईतील फेरीवाला आणि दुकानदारांची संख्या पाहता पथकांची संख्या फारच तोकडी असल्याचे लक्षात येते. कित्येक वेळा सुरक्षारक्षकाअभावी फेरीवाल्यांवर कारवाई करताना कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण होते किंवा आक्रमक झालेले फेरीवाले कर्मचाऱ्यांना पिटाळून लावतात. म्हणून अधिकारी व कर्मचारीही ठरावीक क्षेत्रातच कारवाई करताना दिसतात.