Join us

आणखी सव्वालाख लसीचा साठा मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावर मात करणाऱ्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या आणखी एक लाख २५ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनावर मात करणाऱ्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या आणखी एक लाख २५ हजार लसीचा साठा महापालिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे मुंबईतील लसीकरण मोहिमेला वेग येईल. सध्या परळ येथील एफ दक्षिण विभागात या लसीची साठवण करण्यात आली आहे.

मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानुसार कोविन ॲपवर नाव नोंदणी झालेल्या एक लाख २५ हजार कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. यासाठी १५ जानेवारी रोजी एक लाख ३९ हजार ५०० डोसचा साठा मुंबईत आणण्यात आला. १६ जानेवारीपासून आतापर्यंत १३ हजार ३६५ आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी अद्याप सुरूच आहे. दरम्यान, एक लाख २५ हजार लसीचा साठा गुरुवारी रात्री मुंबईत आणण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला आतापर्यंत दोन लाख ६४ हजार पाचशे लसींचा साठा मिळाला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. मात्र, सुरुवातीला लस घेण्यासाठी ५० टक्केच कर्मचारी हजेरी लावत असल्याने या मोहिमेचा उद्देश असफल होत होते; परंतु आता कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, लसदेखील उपलब्ध झाल्याने लसीकरणाला वेग मिळणार आहे. मुंबईला सव्वालाख लसीचा साठा मिळाल्याच्या वृत्ताला अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुजोरा दिला.

* दुसऱ्या टप्प्यात एक लाख ७० हजार नोंदणी

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ७० हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. लस उपलब्ध होताच दुसऱ्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

-------------------