Join us  

डी गँग टोळीतील आणखीन एक साथीदार एनसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाची (एनसीबी) ड्रग्ज तस्करांंवरील धडक कारवाई सुरू असताना शुक्रवारी कुख्यात डॉन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाची (एनसीबी) ड्रग्ज तस्करांंवरील धडक कारवाई सुरू असताना शुक्रवारी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधील आणखीन एक साथीदार अजीम भाऊ ऊर्फ मोहम्मद अजीम अबू सलीमला अटक केली आहे. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत ड्रग्ज तस्करीबरोबर खंडणी आणि दरोड्याचे गुन्हे नोंद आहेत.

मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवण्याचा कट उधळत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ६ संशयित दहशतवाद्यांंना अटक केली. पाकिस्तान आणि आयएसआय यासाठी दाऊदच्या गँगची मदत घेत होती. ही बाब समोर येताच डी गँगचे साथीदार पुन्हा तपास यंत्रणेच्या रडारवर आले. एनसीबीने यापूर्वीच डी गँगचे मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात करत जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात डोेंगरीतील ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये एनसीबीने माफिया डॉन करीम लाला याचा नातू आणि मुंबईतील ड्रग्ज डीलर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण याला अटक केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ तपास यंत्रणेला चकवा देणाऱ्या मोहम्मद जमान हिदायतुल्ला खान ऊर्फ सोनू पठाण यालाही जेरबंद केले. याचदरम्यान डी गँगच्या ड्रग्ज सिंडिकेटमधील तस्कर मोहम्मद आरिफ हा या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यात पाहिजे आरोपी होता. त्यालाही १० लाखांच्या एमडीसह अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ शुक्रवारी अजीम भाऊ ऊर्फ मोहम्मद अजीम अबू सलीमला अटक केली.