Join us  

कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; प्रज्ञा पवार, प्रतिभा सराफ, गिरीश जाखोटिया मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 4:44 AM

कादंबरी विभागात ‘र. वा. दिघे स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘बदल’ला घोषित झाला आहे.

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०१८-१९ चे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार मंगळवारी मुंबई येथे केंद्रीय अध्यक्ष प्रा.अशोक ठाकूर यांनी जाहीर केले. वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये ‘कविता राजधानी’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा दया पवार यांना जाहीरझाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. कादंबरी विभागात ‘र. वा. दिघे स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘बदल’ला घोषित झाला आहे.

कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कविता, कथासंग्रह, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक-एकांकिका, कला-दृश्यकला-सिनेमा या साहित्य प्रकारांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. डॉ. अनंत देशमुख, डॉ. सुहासिनी कीर्तिकर, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. शुभा चिटणीस, डॉ. विजया वाड, डॉ. महेंद्र भवरे, प्रा. अविनाश देशपांडे यांच्या परीक्षक समितीने पुरस्कारांची निवड केली आहे.

वाङ्मयीन पुरस्कारांच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तर द्वितीय क्रमांकाच्या विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. कादंबरी विभागात र. वा. दिघे स्मृती प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘बदल’ला घोषित झाला आहे. ‘वि. वा. हडप स्मृती’ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दत्ता पवार यांच्या ‘लोकशाहीतील बळी राजे’ला जाहीर झाला आहे.

कथासंग्रहाचा ‘वि. सी. गुर्जर स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विलास गावडे यांच्या ‘तारेवरच्या कसरती’ला जाहीर झाला आहे. तर ‘विद्याधर भागवत स्मृती’ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विजय खाडीलकर यांच्या ‘नुक्कड’ या कथासंग्रहाला देण्यात येत आहे. काव्य वाङ्मय प्रकारात ‘आरती प्रभू स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. घनश्याम बोरकर यांच्या ‘खेळीया’ संग्रहाला जाहीर झाला आहे. तर ‘वसंत सावंत स्मृती’ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नामदेव गवळी यांच्या ‘भातालय’ला घोषित झाला आहे. चरित्र-आत्मचरित्रसाठीचा ‘धनंजय कीर स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार एम. पी. तथा मधू पाटील यांच्या ‘खार जमिनीतील रोप’ला घोषित झाला आहे. तर ‘श्रीकांत शेट्ये स्मृती’ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अशोक समेळ यांच्या ‘स्वगत’ला घोषित करण्यात आला आहे.

समीक्षा ग्रंथासाठीचा ‘प्रभाकर पाध्ये स्मृती’ पुरस्कार विवेक गोविलकर यांच्या ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ला घोषित झाला आहे. ललित गद्यासाठी ‘अनंत काणेकर स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रतिभा सराफ यांच्या ‘सहज संवाद’ पुस्तकाला घोषित झाला आहे.तर लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सुवर्णा जाधव यांच्या ‘रंग जीवनाचे’ला घोषित झाला आहे.बालवाङ्मयासाठीचा ‘प्र. श्री. नेरूरकर स्मृती’ पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या ‘मिसाइल मॅन’ला देण्यात आला आहे. संकीर्ण वाङ्मयासाठीचा ‘वि. कृ. नेरूरकर स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार समीर झांट्ये यांच्या ‘बुद्धायन आणि इतर प्रवास’ला जाहीर झाला आहे.

‘अरुण आठल्ये’ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सुभाष भडभडे यांच्या ‘अंतरंग’ला जाहीर झाला आहे. वैचारिक साहित्यासाठीचा ‘फादर स्टीफन सुवार्ता वसई’ पुरस्कार डॉ. विद्या जोशी यांच्या ‘वृद्धत्वाची ऐशीतैशी’ला देण्यात आला आहे. कोमसापचा विशेष पुरस्कार उदय संख्ये यांच्या संपादित ‘शिवप्रताप दिन विशेष’ला जाहीर झाला आहे.  तर अन्य विशेष पुरस्कारांत यशवंत कदम यांच्या ‘गडगीचाडोह’ या कथासंग्रहाचा व उषा परब यांच्या ‘कुसवा’ या कादंबरीचा समावेश आहे.वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये ‘पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान’ पुरस्कार पालघरच्या डॉ. देवराव पाटील यांना जाहीर झाला आहे. ‘श्री. बा. कारखानीस’ पुरस्कार ठाण्याच्या डॉ. उदयकुमार पाध्ये यांना जाहीर झाला असून या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप ५ हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. ‘गुरुवर्य अ. आ. देसाई’ स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सूर्यकांत मालुसरे यांना जाहीर झाला आहे. ‘राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती’ पुरस्कार लता गुठे यांना जाहीर झाला आहे.‘वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा’ पुरस्कार मालवणच्या शाखेला जाहीर झाला आहे. ‘नमिता कीर लक्षवेधी’ पुरस्कार ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठी संध्या तांबे यांना जाहीर झाला आहे. ‘सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती’ पुरस्कार महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनींसाठी असून तो पुरस्कार रत्नागिरीच्या श्रद्धा हळदणकर हिला जाहीर झाला आहे. ‘कवी उमाकांत कीर स्मृती काव्य’ पुरस्कार अमृत पाटील यांना जाहीर झाला आहे. तर ‘कोमसाप युवा कार्यकर्ता’ पुरस्कार आकाश नलावडे याला जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप २ हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.

टॅग्स :मुंबई