Join us  

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी होणार बंद; रंगमंचाची खोली वाढवण्याचे काम 

By संजय घावरे | Published: May 06, 2024 7:37 PM

भायखळा येथील राणीच्या बागेच्या मागे असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई - भायखळा येथील राणीच्या बागेच्या मागे असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रंगमंचाची खोली कमी असल्याने नाराज असलेल्या निर्मात्यांनी या नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे. नाट्यगृहातील हि त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.

एके काळी महाराष्ट्रातील लोककलावंतासाठी मोठा आधार असलेले हे खुले नाट्यगृह १९५० मध्ये उभारण्यात आले होते. कालांतराने मोडकळीस आलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी ३० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला. आधुनिक शैलीतील रंगमंच, मागे-पुढे होणाऱ्या खुर्च्या, आकर्षक कॅारिडॅार, आधुनिक एकॉस्टिक, प्रकाशयोजना, पंचतारांकित हॅाटेलसारखी स्वच्छतागृहे, देखणी ग्रीन रुम, मेकअप रूम आणि निसर्गरम्य परिसर असलेले ७६१ आसनक्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह रंगकर्मी आणि रसिकांच्या सेवेत रुजू करण्यात आले. हे नाट्यगृह रंगकर्मी आणि रसिकांना नाट्यकृतींचा मनमुराद आनंद देईल, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला, पण तो फोल ठरला. 

कारण एक महत्त्वाच्या उणीवेमुळे रंगकर्मीं आणि नाट्यनिर्मात्यांनी या नाट्यगृहाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले. या नाट्यगृहाचा व्यवसाय दिवसेंदिवस अधिकाधिक बहरण्याऐवजी कमी होऊ लागला. वर्षभरात केवळ सात-आठ नाटके आणि लोककलांचे कार्यक्रम मिळून फार तर २० ते २५ दिवसांचे बुकिंग नाट्यगृहाला मिळत आहे. 

या नाट्यगृहाच्या रंगमंचाची रुंदी मोठी आहे, पण खोली कमी असल्याने कलावंतांना रंगमंचावर वावरणे कठीण जाते. कलावंतांतासाठी हि बाब अडचणीची ठरत असल्याने प्रयोग रंगत नसल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रंगमंचाची खोली वाढवण्याचा निर्णय पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी अंदाजे १५ दिवस नाट्यगृह बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी फार मोडतोड करण्यात येणार नसून, रंगमंचाचा पडदा पुढे घेऊन प्रकाशयोजनेसाठी लावण्यात आलेली यंत्रणाही हलवण्यात येणार असल्याचे समजते.

पावसाळ्यामध्ये नाटकांसोबतच इतर कार्यक्रमांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जूनमध्ये रंगमंच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे समजते. या संदर्भातील अधिकृत माहिती मिळवण्यासाठी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी पालिकेचे उपायुक्त किशोर गांधी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले, पण गांधी सध्या रजेवर आहेत.

टॅग्स :मुंबई