Join us  

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:34 AM

मुंबई काँग्रेसची घोषणा; जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन

मुंबई : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.याविषयी एकनाथ गायकवाड म्हणाले, २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत मुंबई काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर साहित्यरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई काँग्रेसतर्फे सदाकांत ढवणमैदान, दादर पूर्व, मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नातेवाइकांना विशेष आमंत्रित करून त्यांच्याकडे हा पुरस्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात येईल.या कार्यक्रमाला खासदार कुमार केतकर यांच्या सोबत विशेष अतिथी म्हणून शालेय शिक्षणमंत्री व हिंगोलीच्या पालकमंत्री, आमदार वर्षा गायकवाड आणि वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आमदार अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमापूर्वी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील दादर पूर्व येथील मराठी ग्रंथसंग्रहालय ते सदाकांत ढवण मैदान, दादर पूर्व, मुंबई येथपर्यंत मुंबई काँग्रेसतर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच कार्यक्रमादरम्यान मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि पार्टी यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.