Join us  

अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक व सचिवांच्या ईडी कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:06 AM

मनी लॉड्रिंग प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनी लॉड्रिंग व १०० कोटी भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ...

मनी लॉड्रिंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मनी लॉड्रिंग व १०० कोटी भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक व सचिव यांच्या ईडी कोठडीत ६ जुलैपर्यंत विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी वाढ केली.

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने २६ जून रोजी अटक केली. देशमुख व या दोघांच्या घरांवर छापा घातल्यावर ईडीने दोघांना अटक केली. या दोघांवर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग कायद्या (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या दोघांचीही सुरुवातीची ईडी कोठडी संपल्यावर गुरुवारी दोघांनाही विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

या दोघांच्याही ईडी कोठडीत वाढ करण्याची विनंती करताना ईडीने न्यायालयाला सांगितले की, शिंदे तपास कार्याला मदत करत नाहीत. त्याने दिलेले जबाब स्पष्ट नसतात. कॉल रेकॉर्ड व अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे अन्य तपास यंत्रणेकडे उपलब्ध असल्याने या दोघांकडेही त्याबाबत विचारणा करायची आहे, तर पालांडेने देशमुख यांची पोलीस बदल्या व नियुक्त्यांमध्ये विशेषतः आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत भूमिका असल्याचे जबाबात म्हटले आहे. आयपीएस अधिकारी व अन्य पोलिसांच्या बदल्यांबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अनधिकृत यादी तयार करण्यात आली होती, ती यादी तीच आहे का? याची चौकशी पालांडेकडे करायची आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले.

तपासातून नव्या बाबी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित लोकांचे जबाब नोंदवायचे आहेत. पोलीस अधिकारी, पालांडे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील संबंध तपासायचे आहेत. हे दोघेही चौकशीदरम्यान तपास यंत्रणेला समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरले आहेत. या दोन्ही आरोपींची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या चौकशीतून काहीतरी महत्त्वाची माहिती उजेडात येईल. त्यांचा थेट देशमुख यांच्याशी संबंध आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले, तर पालांडे व शिंदे यांच्या वकिलांनी ईडीच्या मागणीवर आक्षेप घेतला. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून ईडीचा युक्तिवाद मान्य करत शिंदे व पालांडे यांच्या ईडी कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ केली.