कोरोनाच्या संकटात प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:10 AM2020-05-25T01:10:13+5:302020-05-25T01:10:39+5:30

आतापर्यंत त्यांनी पेट्रोलपंपावरील तसेच बँकांच्या सुरक्षारक्षकांना जेवण पुरवले.

 Angels rushing to the aid of everyone in the corona crisis | कोरोनाच्या संकटात प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे देवदूत

कोरोनाच्या संकटात प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे देवदूत

Next

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांचे कोणी नाही; किंवा ज्यांना कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. अशा या संकटात त्यांना मदत करण्यासाठी कोविड योद्धा पुढे आले आहेत. यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश असून, दादर येथील शेफ तुषार देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय साहित्य आणून देणे, किरणा पोहोचता करून देणे यांसह रुग्णांना मदत करण्यासाठी देशमुख आपल्या मित्रांसोबत कार्यरत असून, मुंबईकरांनी त्यांना देवदूताची उपमा दिली आहे. शेफ तुषार प्रीती देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांची मित्रमंडळी दादरसह मुंबईतल्या शक्य त्या परिसरात कोविड योद्धा म्हणून कार्य करत आहेत. यामध्ये प्रीती बटा, जितेंद्र पाटील, अक्षता तेंडुलकर, जतीन देसाई, योगेश म्हात्रे, अंकिता कुलकर्णी, मंदार केळकर, केतकी भागवत, डॉ. अमेय विजयकर, डॉ. हेमंत बैलूर, जी नॉर्थ महापालिका, पोलीस, मेडिकल व किराणा स्टोअर्स मालक अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

आतापर्यंत त्यांनी पेट्रोलपंपावरील तसेच बँकांच्या सुरक्षारक्षकांना जेवण पुरवले. हिंदू नववर्ष समितीच्या माध्यमातून कार्यकर्ता या नात्याने ज्येष्ठांसाठीच्या उपक्रमात सहभागी होऊन अनेक आजी-आजोबांना जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्नधान्य व भाजीपाला घरपोच उपलब्ध करून देत आहेत. महानगरपालिकेचे सफाई कामगार, पोलीस, कामगार वर्ग, सोसायटीचे वॉचमन तसेच जे मजूर चालत घरी चालले आहेत, अशांना फूड पॅकेट्स पुरवतात. ज्यांना वेळेवर सिलिंडर मिळत नव्हते अशा गरजूंना आपला मित्र प्रकाश बेलवडे यांच्या मदतीने सिलिंडर उपलब्ध करून दिले. नेत्यांकडून मिळालेले धान्य किट्स, कांदे, मास्क, फेस शिल्ड अनेक गरजू लोकांना दिले. तसेच अनेक सोसायटींमध्ये थेट शेतकऱ्यांकडील भाजीपाला व फळांचे टेंम्पोही उपलब्ध करून दिले. रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

अनेक पोलीस व महापालिकेतील गरजूंना योग्य मदतीची सोय करून दिली. रेस्टॉरंटमधील मनातून खचलेल्या १४ कामगारांना दिलासा देऊन चुकीचे पाऊल उचलून पळून जाऊ नये याकरिता त्यांना आधार देऊन राहण्याची व जेवणाची सोय केली. याबाबत तुषार सांगतात की, हे सर्व कार्य शक्य आहे ते माझा मित्र योगेश म्हात्रे, त्याची आई नीना म्हात्रे, वडील दिलीप म्हात्रे, भाऊ कुंदन म्हात्रे व कुटुंबीय यांच्यामुळे. गेली २० वर्षे मी त्यांच्याकडे राहतो आहे. त्यांनी विरोध केला असता तर काहीच शक्य नव्हते. पण त्यांचे सहकार्य व पाठबळामुळे आम्ही हे करू शकलो.

Web Title:  Angels rushing to the aid of everyone in the corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.